पीककर्जाअभावी तारांबळ; हंगाम विस्कळीत, पेरण्यांची टक्केवारी जेमतेम

0
नाशिक (सोमनाथ ताकवाले)| खरीप तयारीत पीककर्ज मिळवणे आणि त्याचा विनियोग बियाणे, खते, मजुरांची देणी आणि इतर शेतीपूरक खर्चासाठी करणे हा दरवर्षी शेतकर्‍यांचा खरीप हंगामातील नित्यक्रम असतो. यंदा त्यात काही प्रमाणात विस्कळीतपणा आला आहे. त्यामुळे खरीप पेरण्या, शेती तयारीसाठी पीककर्ज मिळाले नसल्याने तारांबळ उडाली आहे.

जिल्ह्यात सुमारे 7 लाख हेक्टर क्षेत्र यंदा लागवडीखाली येणार आहे. त्याची तयारी शेतकर्‍यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू केली आहे. पीककर्ज घेण्यासाठी जिल्हा बँक, राष्ट्रीयकृत बँक आणि सहकारी सोसायट्यांकडे जाणार्‍या शेतकर्‍यांची संख्या यंदा लक्षणीय होती.

मात्र पीककर्ज मिळत नसल्याची तिन्ही वित्तीय संस्थांमध्ये वस्तुस्थिती होती. त्याला कारण म्हणजे चलनबंदी आणि जिल्हा बँकेला चलनाचा तुटवडा हे कारण होते. मात्र काही कालावधीनंतर तरी पिकांसाठी बँकेकडून कर्ज मिळले, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती. मात्र जून महिना उलटून गेला तरी अद्याप शेतकर्‍यांना पीककर्ज उपलब्ध होत नसल्याची ओरड जिल्ह्यात कायम आहे.

पीककर्ज मिळावे म्हणून जिल्हा बँकेला टाळे ठोकणार्‍या शेतकर्‍यांना नंतर कर्जमाफी मिळण्याची आशा लागून होती. त्यासाठी झालेला शेतकरी संप आणि महाराष्ट्र बंद ही दोन आंदोलने शेतकर्‍यांना खरीप हंगामाच्या तयारीसाठी विचलित करणारी ठरली.

पीककर्ज घ्यावे की नाही, कर्जमाफी मिळेल की नाही, या विचाराने शेतकर्‍यांची द्विधा मन:स्थिती झाली. ज्या शेतकर्‍यांनी पीककर्जासाठी जिल्हा बँकेकडे अर्ज सादर केले त्यांना बँकेकडून रुपयाही कर्ज मिळाले नाही. त्यामुळे तयारी तरी कशी करायची या विचाराने शेतकर्‍यांनी यंदा खरीप हंगामाच्या तयारीला विलंबाने सुरुवात केले होती. त्यामुळे पेरण्यांची टक्केवारी जेमतेमच झाली आहे.

कर्जमाफीच्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे चौकशी करणार्‍या शेतकर्‍यांची रीघ लागली असली तरी कर्जाअभवी पेरण्यांना विलंब झाल्याचे सांगत आता जे पीक चांगला मोबदला देईल किंवा त्याला हमीभाव असेल, अशा पिकांची पेरणी करण्यावर शेतकर्‍यांनी भर दिला आहे.

LEAVE A REPLY

*