कुत्र्याच्या चाव्याने मोराचा मृत्यू; वन विभाग सुस्त

0

नाशिक | प्रतिनिधी

गंगापूर रोडवरील लोकमान्यनगरच्या उद्यानाजवळ भटक्या कुत्र्यांनी मोराला लक्ष्य करत चावा घेतल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

परिसरातील विजय धुमाळ यांना या मोरामागे कुत्रे धावत त्याचे लचके तोडत असल्याचे दिसले. त्यानी धावत जावून मोराला कुत्र्याच्या तावडीतून सोडविले.

त्यानंतर मोराला उपचारासाठी अशोकस्तंभावरील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. मात्र, दवाखाना बंद असल्याचे त्यांना दिसले.

त्यामुळे आता काय करावे हा प्रश्न त्यांना पडला. सुमारे तासभर मोर अत्यवस्त होता. ही माहिती तत्काळ वन विभागाला कळवण्यात आली.

दरम्यान, अनेक फोन वन विभागाला केले गेले. तरीही अधिकारी वर्गाने फोन उचलले नाही. वन विभागाकडून वेळीच उपचार होत नसल्याने मोर धापा टाकत होता.

त्यानंतर एका संस्थेचे कार्यकर्ते येवून पोहचले. मग वन विभागाची गरजच काय असा प्रश्न नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी उपस्थित केला.

माहिती देवूनही तब्बल एक तासानंतर वनविभागाची गाडी आली. तोपर्यंत मोराने जीव सोडला होता. शहराचे तपमान चाळीशी पार होत असतांना पाण्यासाठी वन्यप्राणी, मोर शहराकडे येऊ लागले आहे. जर वेळेवर त्यांना रेस्क्यू केले नाही तर त्यांचा किंवा माणसाचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रेस्क्यू सेंटर व्हावे

नाशिक येथे वन विभागाचे रेस्क्यू सेंटर व्हावे यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असून वन विभागाने उन्हाळ्यात सतर्क राहणे गरजेचे आहे. या मोराच्या मृत्यूला ‘वन विभाग’ जबाबदार असल्याचे निसर्ग छायाचित्रकार प्रा. बोरा यांनी सांगितले असून वन विभागावर गुन्हे का दाखल करू नये, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

*