मोठे पवार समतोल साधणार?

0

घुले बंधुंनी कंबर कसली, राजकीय बांधणीचा प्रयत्न

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दौर्‍याच्या निमित्ताने राष्ट्रवादी पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शनाच्या तयारीत आहे. त्यांचा भेंडा येथील नागरी सत्कार सोहळा आणि माजी आमदार पांडुरंग अभंग यांचा अमृत महोत्सव यशस्वी व्हावा, यासाठी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले आणि माजी आमदार नरेंद्र घुले यांनी कंबर कसली आहे. पवार यांच्याकडून ज्येष्ठ आणि तरुण नेतृत्वात समतोल राखण्याचा प्रयत्न होणार का, या प्रश्‍नासह पुढील राजकीय दिशेबाबतही उत्सुकता वाढली आहे.

 

 

शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला जिल्हा म्हणून नगरची ओळख आहे. राष्ट्रवादीचे अनेक मातब्बर या जिल्ह्यात आहेत. मात्र अलिकडे पक्षात आलेली मरगळ आणि कुरबुरी चर्चेत होत्या. मध्यंतरी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरमध्ये मेळावा घेऊन पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेताना, ज्येष्ठांना मार्गदर्शकाच्या भूमिकेत शिरण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला होता. त्यामुळे पक्षात चुळबुळ झाली होती. पक्षात मोठ्या आणि छोट्या पवारांचे स्वतंत्र गट असल्याची चर्चा झडत असते. त्यामुळे आता मोठे पवार भेंड्यातील कार्यक्रमातून कसा राजकीय समतोल साधणार, याकडे लक्ष आहे. माजी आमदार चंद्रशेखर घुले जिल्हाध्यक्ष झाल्यापासून गेला महिना पक्षबांधणीच्यादृष्टीने अधिक गतीमान ठरला. नगरच्या मेळाव्याच्या निमित्ताने त्यांनी जिल्हा पिंजून काढला होता.

 

 

आता भेंडा येथे शनिवारी सकाळी होणार्‍या शरद पवार यांच्या नागरी सत्काराच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शनाची तयारी त्यांनी केली आहे. पवारांचा घुले परिवारावर स्नेह आहे. विधानसभेतील अपयशानंतर राजकारणात माघारलेल्या घुलेंनी आलिकडच्या काही महिन्यात पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली आहे. जिल्हा परिषदेच्या राजकारणात सत्तेचा यशस्वी डाव खेळल्यानंतर घुले आता पुढील तयारीला लागल्याचे म्हटले जाते.

 

 

पक्षावरील पकड मजबूत करण्यासाठी त्यांनी पवारांच्या दौर्‍याचा खुबीने वापर करून घेतला आहे. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाची बांधणी त्यांनी आधीच सुरू केली आहे. आता नेवासा येथील आव्हान पेलण्याच्यादृष्टीने भेंड्यातील कार्यक्रम मदतीचा ठरेल, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. विधानसभा निवडणुकीनंतर नेवासा तालुक्यात त्यांचे प्रतिद्वंदी शंकरराव गडाख यांनी त्यांना यश मिळू दिलेले नाही. या अपयशावर मात करण्यासाठी घुलेंना नेवासा मतदारसंघात यश मिळवून देणारा राजकीय डाव टाकावा लागणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते माजी आमदार पांडुरंग अभंग यांचा अमृत महोत्सव सोहळा अधिक चर्चेत आला आहे.

 

 

जिल्ह्यातील राजकारणात पक्षांतर्गत विरोध मोडून काढता यावा, यासाठी या कार्यक्रमाचा घुलेंकडून वापर होईल, असा कयासही बांधला जात आहे. अधून-मधून घुलेंवर निष्क्रिय असल्याचा ठपका ठेवण्याचा प्रयत्न होतो. मात्र या कार्यक्रमामुळे ती संधी पुन्हा द्यायची नाही, असा त्यांचा प्रयत्न दिसतो. भेंडा येथील या कार्यक्रमातून पक्षाला पुढील दिशा मिळेल, असे राष्ट्रवादीत म्हटले जात आहे. त्यामुळे हा सोहळा चर्चेत आला आहे.

LEAVE A REPLY

*