Type to search

एक विचाराने राहून विकास साधणे हीच बापूंना श्रद्धांजली : शरद पवार

Featured सार्वमत

एक विचाराने राहून विकास साधणे हीच बापूंना श्रद्धांजली : शरद पवार

Share
श्रीगोंदा, लिंपणगाव (तालुका प्रतिनिधी) – बापू सदैव ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या हिताचा विचार मांडत असत. काळ्या आईशी ईमान राखणार्‍या शेतकर्‍यांशी बापूंची बांधिलकी होती. बापूंचे विचार आणि आदर्श मनाशी बाळगत समाजाचा व परिसराचा सर्वांगीण विकास साधणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी असून त्यासाठी एक विचाराने राहून सर्वांगीण विकास साधणे हीच बापूंना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली.

रविवारी सकाळी खा. शरद पवार यांनी वांगदरी येथे नागवडे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. खा. पवार म्हणाले, ‘बापूं’नी सहकारी संस्थांमध्ये कामाचा आदर्श सर्वांसमोर ठेवला, तो जतन करणे गरजेचे आहे. बापूंचे मार्गदर्शन हा सगळ्यांचा मोठा आधार होता. त्यांना राज्यातील सहकारी कारखानदारीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. बापू आमदार राहुलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्यामुळे राहुलला संधी मिळाली. बापूंची पुढची पिढी अनुराधा व राजेंद्र नागवडे समाजात चांगले काम करीत आहेत. बापूंच्या जाण्याने त्यांचा आधार तुटला आहे.
नागवडे कुटुंबीयांना साथ देणे ही आमदार राहुल आणि सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. खा. पवार म्हणाले, बापूंच्या अंगात प्रचंड इच्छाशक्ती होती.

ते आजारपणातून बाहेर पडतील अशी सर्वांना आशा होती, मात्र सर्व काही तुमच्या आमच्या हातात नसते. बापूंनी दाखवलेल्या आदर्श मार्गाने मार्गक्रमण करून समाजाचा व परिसराचा सर्वांगीण विकास साधणे हीच बापूंना खरी श्रद्धांजली ठरेल, त्यांचे सर्वांशी सुसंवाद व विचारविनिमय केलेले काम आयुष्यभर स्मरणात राहील, अशी भावना खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. रविवारी दिवसभरात आमदार मोनिका राजळे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, साई संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी आमदार अशोक पवार, अरुण कडू, प्रताप ढाकणे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी विश्वजित माने, जगन्नाथ भोर, आनंद कदम, प्रांजल शिंदे, रमेश खाडे, कैलास तांबे आदींनी नागवडे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.

खा. पवार यांचे नागवडे निवासस्थानी आगमन झाल्यानंतर त्यांनी स्वर्गीय बापूंच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहिली. या प्रसंगी पत्नी कौशल्यादेवी नागवडे, पुत्र राजेंद्र नागवडे, व दीपक नागवडे, मुली मंगलताई, मीनाक्षी, शीतल, शैलेजा, सून अनुराधा नागवडे व ज्योती नागवडे, सर्वच नागवडे परिवारातील सदस्यांचे सांत्वन केले. यावेळी आमदार राहुल जगताप, आमदार मोनिका राजळे, प्रतापराव ढाकणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कॉगे्रसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, आदींसह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कामगार, तसेच नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष केशवराव मगर व संचालक उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!