Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या राजकीय

Blog : सत्तानाट्यातील ‘पवार फॅक्टर’…

Share
लोक माझे सांगाती आपल्या राजकीय आत्मकथनाची सुरूवातच शरद पवार अशी करतात-‘भूतकाळात मी फारसा रमणारा नाही.’ त्यामुळे 2014चे निकाल, देशातलं मोदीफॅक्टरने भारावलेलं वातावरण, राज्यातली युतीची सत्ता, राज्यातही अगदी तळापर्यंत भाजपला मिळालेलं समर्थन किंवा 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेलं पक्षांतर…
या साऱ्या घडामोडींचा समावेश अगदीच भूतकाळात करता येत नसला, तरी त्यांचं मळभ भविष्यावर दाटू न देता शरद पवार झंझावाती प्रचार करत राहिले. आघाडीतील काँग्रेस पक्ष भूतपूर्व यशापयशाच्या आत्मचिंतनात आणि त्यामुळेच चिंताग्रस्त असल्याने निवडणूकपूर्व प्रचाराची धुराही एकट्या शरद पवारांनीच सांभाळली.
प्रचाराच्या शेवटच्या काही दिवसात तर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण पुन्हा एकदा शरद पवारांभोवती एकवटलेले दिसले विरोधकांच्या पवारकेंद्रित टीकांमुळे ते वातावरण तसे सुरूवातीपासूनच शरद पवार यांच्या भोवतीच एकवटलेले होते.
नंतर जवळजवळ सर्वच माध्यमांच्या पोल्सनुसार आणि त्यानंतरच्या निकालानुसारही राज्यात युतीचेच सरकार येण्याची चिन्हे निर्माण झाली. पण सुरुवातीला जागावाटपावरून आणि आता मुख्यमंत्रीपद तसेच खातेवाटपावरून सुरू असलेल्या भाजप आणि शिवसेनेतल्या लुटूपुटू भांडणांना संजय राऊत यांच्या माध्यमातून आक्रमकतेची धार मिळाली.
अशा वेळी शरद पवार शिवसेनेला पाठिंबा देणार, काँग्रेसला सेनेला पाठिंबा द्यायला शरद पवारच भाग पाडणार, आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यासह सेना+राष्ट्रवादी+काँग्रेसचे नवे सरकार स्थापन होणार अशा चर्चांना उधाण आलं.  केवळ चर्चाच नव्हे तर तशी दाट शक्यताही निर्माण झाली. पण एकूणच राजकीय विश्लेषकांना, माध्यमांना, राजकारणाची थोडीफार जाण असलेल्या राजकीय साक्षरांना जे काही वाटतं, त्यांच्याकडून जे काही अंदाज बांधले जातात ते तंतोतंत खरे निघाले तर ते डावपेच म्हणजे शरद पवारांचे डावपेच कसले?
अर्थातच परिणामी महाराष्ट्राच्या राजकीय सत्तानाट्याला थेट  360° कोनातून कलाटणी मिळते. सेनेकडूनही राष्ट्रवादीला आणि विशेषतः शरद पवारांना अनुकूल वक्तव्यांची बरसात होऊ लागते.
या ठिकाणी एक लक्षात येते,  निकालानंतरच्या सुरुवातीच्या काही दिवसांत शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर भाजपकडे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडेही चांगलीच वाढलेली दिसली. पण नंतरच्या काही दिवसांत मात्र सेनेपेक्षा जागा कमी असूनही शरद पवार यांचीच बार्गेनिंग पॉवर अंतिम आणि निर्णायक असल्याचं जाणवतंय. याठिकाणी महत्त्वाच्या तीन  मुद्द्यांचा विचार करावा लागेल.
1)भाजपची शिवसेनेबाबतची भूमिका.
गेल्या पाच वर्षात छोट्या भावावरून मोठा भाऊ होण्याची भाजपची धडपड चांगलीच यशस्वी झाली आहे. त्यामुळे ज्या महत्त्वाच्या खात्यांबाबत भाजप आणि सेना हे दोन्ही पक्ष आग्रही आहेत, त्यातील काही खाती शिवसेनेला देण्याची तयारी दाखवून भाजप एक पाऊल मागे येईलही कदाचित. पण मुख्यमंत्रीपद देण्याइतपत भाजपचा तथाकथित इगो आणि अतिमहत्त्वाकांक्षा नक्कीच कमी होणार नाही.
त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून एकीकडे आग्रही असताना 2014 प्रमाणे शरद पवार भाजपला पाठिंबा देणार का? याचे किंतु-परंतु आणि धाकधूक सेनेच्या मनात असणारच. आता शरद पवार भाजपला पाठिंबा देतील अथवा नाही या पवारांच्या राजकीय डावपेचांचा थांगपत्ता लागणं सध्या तरी अशक्य आहे. मात्र तरीही राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यातून भाजपचे मुख्यमंत्रीपद सुरक्षित आणि महत्त्वाची खातीही आपसूकच भाजपकडे असतील.  त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवरच सेना-भाजप तिढ्याचा निर्णय अवलंबून असल्याचे दिसत आहे.
2) शिवसेनेची राष्ट्रवादीबाबतची भूमिका
फिफ्टी-फिफ्टी फाॅर्मुल्याबाबत भाजपने लबाडी केली काय किंवा पाच वर्ष भाजपच्या सोबत राहून सेनेलाही अतिमहत्त्वाकांक्षी असण्याची उबळ आली आहे काय?  काहीही असो. मात्र भाजप एक पाऊल मागे येत असताना मुख्यमंत्रिपदावर शिवसेना एक पाऊल मागे येईल का? सध्या शिवसेनेत संजय राऊत यांची भूमिकाही अग्रस्थानी दिसते आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला सध्या तरी बराच अर्थ आहे. पण मुळात संजय राऊत हे शिवसेनेचे एकनिष्ठ नेते असण्याबरोबरच भाजपविरोधक जेवढे आहेत, तेवढीच त्यांची अप्रत्यक्षपणे पवारसमर्थक असण्याची भूमिकाही लपून राहिलेली नाही.
3)महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पवारांचे बोट धरून जाणार का?
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांवर तसाही केंद्रीय काँग्रेस पक्षश्रेष्ठींपेक्षा शरद पवारांचा प्रभाव अधिक आहे. आघाडीतर्फे निवडणूक लढवितानाही पवारांचाच फाॅर्मुला अधिक वरचढ दिसतो. आघाडीच्या जागावाटपातही शरद पवारच केंद्रस्थानी राहिले. त्यामुळे सेनेसोबत जाण्याच्या भूमिकेवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपेक्षा ज्येष्ठ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांनी नेतृत्व स्वीकारलंय.
परिणामी सुरुवातीला शिवसेनेसोबत जाण्यास ठाम नकार देणाऱ्या सोनियाजी शरद पवारांसोबतच्या बैठकीला आणि चर्चेला तयार आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यास कॉंग्रेसही शरद पवारांचे बोट धरून जाणार हे निश्‍चित आहे.  येथेही शरद पवार यांचेच महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होते.
थोडक्यात सांगण्याचा मुद्दा असा की, जागा किती लढवल्या? जागा किती जिंकल्या? अपक्ष कोणासोबत जाणार? किंवा कोणता पक्ष कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार?  हे सारे प्रश्न बाजूला पडून, हे सारे प्रश्न गौण ठरून उद्याच्या शरद पवार-सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर शरद पवार काय भूमिका घेणार यावर आता महाराष्ट्रातील सत्ता आणि एकूणच राजकारणाला वेगळी कलाटणी मिळणार आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी कोणत्या पक्षाला किती पर्याय उपलब्ध आहेत, यापेक्षा शरद पवारांच्या भूमिकेशिवाय सध्यातरी महाराष्ट्रात कोणता पर्याय दिसत नाहीये हे अगदी स्पष्ट आहे.
– निकिता पाटील, मुंबई. 
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!