Type to search

Featured maharashtra आवर्जून वाचाच सार्वमत

पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत दुष्काळाबाबत चर्चा

Share

नगरसह अन्य जिल्ह्यांतील शेतकर्‍यांच्या समस्या मांडल्या जनावरांच्या चारा अनुदानात वाढ

मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’निवासस्थानी भेट घेऊन दुष्काळाबाबत चर्चा केली. या बैठकीला फडणवीस आणि पवार यांच्यासह अजित पवार, राणा जगजीतसिंह पाटील, दीपक आबा साळुंखे उपस्थित होते. सोलापूर, बीड, अहमदनगर व सातारा जिल्ह्यांतील काही गावांना भेटी देऊन तेथील जनतेच्या दुष्काळी परिस्थितीचा जो आढावा घेतला तो व समस्या मुख्यमंत्री महोदयांसमोर मांडल्या.

दुष्काळाबाबत झालेल्या बैठकीत फळबाग, छावण्या, दुष्काळी भागातील नागरिकांच्या हाताला काम, पाण्याचं योग्य नियोजन, दुष्काळी भागात अन्नधान्य नियोजन, जायकवाडी धरणातील पाणी यासारख्या प्रमुख विषयांवर चर्चा झाली.
दुष्काळग्रस्त भागात जनावरांच्या छावण्या उशिरा दिल्या गेल्याचा प्रश्न यावेळी पवारांनी उपस्थित केला. केवळ ऊस चारा न देता इतर चारा द्यावा, त्याचप्रमाणे चारा अनुदान केवळ 90 रुपये दिले जाते, ते 110 करण्याची मागणीही पवारांनी केली. त्याचवेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चारा अनुदानात वाढ करत प्रत्येक जनावरामागे 100 रुपये देण्याची घोषणा केली.

चारा छावण्यांतील जनावरांसाठी लागणार्‍या वैरणीची खरेदी व त्यावरील वाहतुकीचा खर्च तसेच मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिवस 18 किलो हिरवा चारा व आठवड्यातून तीन दिवस 1 किलो पशुखाद्य आणि लहान जनावरांसाठी 9 किलो हिरवा चारा व लहान जनावरांसाठी 1 किलो पशुखाद्य देण्यात येत असल्यामुळे चारा छावण्यांना देण्यात येणार्‍या अनुदानामध्ये प्रति जनावर 10 रुपयांची वाढ करून आता मोठ्या जनावरांसाठी 100 रुपये तर लहान जनावरांसाठी 50 रुपये दर देण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. पाटील यांनी दिली.

फळबागा जळून चालल्या आहेत. फळबाग जळणे म्हणजे 25 वर्षाचा विषय आहे. आमच्या सरकारच्या काळात आम्ही प्रति हेक्टर 35 हजार दिले होते, तितकी रक्कम द्यावी, दुष्काळग्रस्त भागात पाणी वाटपात होणारा घोटाळा थांबवावा, अशी विनंतीही शरद पवारांनी केली.

छावण्या सुरु झाल्या, पण ज्या संस्था छावण्या चालवतात त्यांना पैसे दिले गेले नाही. एका दिवसाचा संस्थांचा खर्च एक लाख रुपये आहे. संस्था महिनाभर छावण्या कशा चालवणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. विमा पैसे मिळले नसून फळबाग योजनेचा विमा का मिळाला नाही, असाही सवाल पवारांनी विचारला.

नगरसह राज्यात काही भागांत 1972 पेक्षा भीषण दुष्काळ- पवार
अहमदनगर, सातारा, सोलापूर, बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात 1972 पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. या जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर शेतकर्‍यांनी मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून लक्ष घालावे आणि संपूर्ण दुष्काळी भागासाठी सर्वंकष निर्णय घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!