पाथर्डी नरबळी प्रकरण : नगरमधील तिघांसह चौघांना अटक ; दोन पसार

0

पाथर्डी (प्रतिनिधी) – तालुक्यातील जांभळी गावाच्या शिवारात पौर्णिमेच्या दिवशी गुप्तधनाच्या लालसेपोटी नरबळी देण्याचा प्रयत्न नागरिकांच्या जागृकतेने फसला आहे. मेटल डिटेक्टर सारख्या गोल असणार्‍या यंत्राचा वापर गुप्तधन सापडण्यासाठी करण्यात आला आहे.

पोलिसांनी दोन तवेरा गाड्यांसह चार जणांना ताब्यात घेतले असून यामध्ये गावातीलच एकाचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी अधिनियम, गुप्तधन प्राप्त करण्यासाठी अघोरी पूजा करणे यासह विविध जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.
तालुक्यातील जांभळी गावाच्या शिवारात रविवारी रात्री पौर्णिमेच्या दिवशी पिराच्या मंदिराजवळ गुप्तधन मिळवण्याच्या लालसेपोटी मांत्रिकाच्या साहाय्याने अघोरी पूजा करून नरबळी देण्याचा प्रयत्न गावातीलच नागरिकांच्या मदतीने फसला आहे. याबाबत जालिंदर आव्हाड (रा.जांभळी) यांनी फिर्याद दिली आहे.
रविवारी रात्री नऊ वाजल्याच्या सुमारास दोन तवेरा गाड्या पिराच्या मंदिराकडे जाऊन थांबलेल्या जालिंदर आव्हाड यांना दिसल्या. यावेळी आव्हाड यांनी शेजारी असणार्‍या इतर नागरिकांना याची माहिती फोनवरून दिल्यामुळे इतर नागरिक घटनास्थळी आले. तसेच या घटनेची माहितीही तोपर्यंत पोलिसांना कळविली होती.
यावेळी नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता पिराच्या मंदिराजवळ सहा लोक खड्डा खोदतांना दिसून आले. बॅटरीच्या उजेडात खड्डा खोदण्याचे काम ूहे लोक करीत असल्याचे निदर्शनास आले. तोपर्यंत गावात वार्‍यासारखी खबर फोनवरून पसरली होती. त्यामुळे अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी काय चालले आहे हे पाहण्यासाठी नागरिक पुढे गेले असता कोणीतरी येत असल्याचे कळताच संशयित पळायला लागले. यावेळी गावातील नागरिकांनी एकनाथ पांडुरंग आव्हाड (रा.जांभळी, हल्ली रा. केडगाव), सचिन मनोहर पोतदार (रा. भूषणनगर, केडगाव), गणेश शहाजी नवले (रा. पिंपळे गुरव, पुणे), दादासाहेब मारुती देवकर (रा.चास, ता. नगर) या चार जणांना पकडले.तर इतर दोघेजण गुप्तधन तपासण्यासाठी आणलेले मेटल डिटेक्टर सारखे दिसणारे गोल मशीन घेऊन पळून गेले.
यावेळी उपस्थित नागरिकांनी घटनास्थळी असणार्‍या दोन तवेरा गाड्यांच्या चारही बाजूंच्या काचा फोडत गाडीवर दगडं टाकले. पाथर्डी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक भोईटे, पो.कॉ. संजय आव्हाड, संभाजी शेंडे, भगवान सानप, राहुल खेडकर आदी यावेळी घटनास्थळी पोहचले.
यावेळी नागरिकांनी पकडलेल्या संशयितांना पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनास्थळी चार बाय तीनचा खोदलेला खड्डा आढळून आला. याठिकाणी पूजा करण्यासाठी लिंबू, नारळ, गुलाल, हळद, कुंकू यासारख्या वस्तू आढळून आल्या. तर खड्डा खोदण्यासाठी टिकाव, खोरे, घमेले इतर साहित्य सापडले असून ते पोलिसांनी जमा केले आहे. घटनास्थळावरून दोन्ही तवेरा गाड्या रात्री उशिरा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत.
यावेळी नागरिकांकडून संशयितांवर दगडफेकही करण्यात आली. त्यामध्ये एकाच्या डोक्याला किरकोळ मार लागला आहे. पोलिसांच्या ताब्यात असणारे गावातील एकनाथ आव्हाड यांना याठिकाणी गुप्तधन असल्याची माहिती ऐकली होती.
त्यावरूनच आव्हाड याने मांत्रिकासह इतर चार लोकांना घटनास्थळी आणून गुप्तधन शोधण्याचे यंत्र आणून गुप्तधन असल्याचे तपासून पाहिले. यावेळी यंत्राने गुप्तधन असल्याचा सिग्नल दिला होता. असे संशयित एकनाथ आव्हाड यांनी सांगितले.
याप्रकरणी जालिंदर आव्हाड यांच्या फिर्यादीवरून वरील चार जण तर राजा भोज (पूर्ण नाव माहीत नाही, रा. नेहरूनगर, पुणे), गायकवाड (पूर्ण नाव माहीत नाही, रा. वैजापूर, जिल्हा औरंगाबाद) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर दोन फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास पो.हे.कॉ. चव्हाण हे करत आहेत.
  •  एकनाथ आव्हाड (मात्र हल्ली रा. केडगाव) यांचे आईवडील जांभळी या गावातच राहतात. रात्री नऊ वाजता इकडे गुप्तधनासाठी खड्डा खोदत असताना त्याचवेळी आव्हाड यांच्या आईवडील राहतात त्या घरात सुमारे सात ते आठ फुटाचा कोब्रा जातीचा काळा विषारी नाग निघाला. यावेळी तरुणांनी त्यास मारण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला नाही.

LEAVE A REPLY

*