श्रीरामपूर ते पाथर्डी गावठी कट्टा कनेक्शन

0

व्हाया शेवगाव, श्रीरामपूरचे दोघे अटकेत; 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – पाथर्डी येथे गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी सापळा रचून शेवगाव तहसील कार्यालयासमोर श्रीरामपूर येथील एकजणाला अटक केली आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचा निळ्या रंगाचा पट्ट्या असलेला लोखंडी बॅलरचा कट्टा आढळून आला.

या घटनेने श्रीरामपूर ते पाथर्डी गावठी कट्टा कनेक्शन समोर आले आहे. याप्रकरणी दत्तू शेळके व एजाज शेख (दोघे रा. श्रीरामपूर) यांना अटक करण्यात आली असून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

श्रीरामपूर (वार्ड क्र. 3) येथील हेमंत ऊर्फ दत्तू किशोर शेळके हा सोमवार 2 ऑक्टोबर रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास श्रीरामपूर येथील एजाज आदम शेख (रा. वार्ड क्र. 5) याच्याकडून देशी बनावटीचा लोखंडी कट्टा घेऊन पाथर्डी येथील अश्पाक खलिफा याला विक्री करण्यासाठी शेवगाव येथून जात होता.

याची माहिती विभागीय पोलीस अधिकारी अभिजीत शिवथरे यांना समजली. त्यांनी पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्यासह सपोनि. मगर, पोना. चव्हाण, पो. काँ. सागर बुधवंत, मपोकाँ. काळे यांच्यासह छापा टाकून आरोपी दत्तू शेळके याला शेवगाव तहसील कार्यालयासमोरून पाथर्डीकडे जात असताना ताब्यात घेतले.

यावेळी दत्तू शेळके याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 12 हजार रुपये किमतीचा एक देशी बनावटीचा लोखंडी मग्झिन ट्रिगर असलेला व दोन्ही बाजूंनी निळ्या रंगाचे पट्टे असलेला 15 सेमी व 8 सेमी कट्टा बॅलरची लांबी असलेला कट्टा आढळून आला.

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने तो कट्टा श्रीरामपूर येथील एजाज आदम शेख याच्याकडून घेऊन पाथर्डी येथील अश्पाक खलिफा याला विक्री करण्यासाठी जात असल्याचे सांगितले.

याप्रकरणी पो. काँ. सागर रावसाहेब बुधवंत यांच्या फिर्यादीवरून आरोपी हेमंत ऊर्फ दत्तू किशोर शेळके (रा. वार्ड क्र. 3, श्रीरामपूर) याच्या विरोधात विनापरवाना शस्त्र बाळगणे व भारतीय शस्त्र अधिनियमन 1959 चे कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

पोलिसांनी एजाज शेख (रा. श्रीरामपूर) यालाही अटक केली असून पाथर्डी येथील अश्पाक खलिफा याचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे हे करीत आहेत. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत गावठी कट्टा सापडल्याने खळबळ उडाली असून पोलिसांनी वेळीच खबरदारी घेतल्याने कट्टा प्रकरण समोर आले आहे.

शेवगाव येथे विक्रीसाठी कट्ट घेऊन जात असल्याने पोलिसांनी दत्तू शेळके याला अटक केली. या निमित्त गावठी कट्ट्याचे श्रीरामपूर ते पाथर्डी कनेक्शन समोर आले असून पाथर्डी येथील अश्पाक खलिफा याला कट्टा कशासाठी पाहिजे होता? श्रीरामपूर येथील एजाज शेख याने आतापर्यंत किती कट्टे विकले? हे कट्टे तो कोठून आणत होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

*