Friday, May 3, 2024
Homeनगरपाथर्डीची पालिका ठेकेदार चालवतात

पाथर्डीची पालिका ठेकेदार चालवतात

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

भ्रष्ट नेत्यांचा धिक्कार असो, टक्केवारीवर चालणार्‍या नेत्यांची चौकशी करा, जनतेची कामे होत नसतील तर तमाशाचे फड काढून

- Advertisement -

गावोगावी फिरा, पालिका ठेकेदार चालवतात, पदाधिकारी व अधिकारी शनिवार, रविवार येऊन टक्केवारीचा हिशोब करतात, अशी टीका करत आम आदमी पार्टीच्या वतीने पालिका कार्यालयावर डफडे व पोतराज मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी माया जाधव या महिलेने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने काहीकाळ प्रचंड तणाव वाढला.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गेल्या दोन वर्षापासून सुमारे 300 लाभार्थ्यांचे अनुदानाचे हफ्ते प्रलंबित आहेत. अनेकांनी राहती घरे पाडून ठेवली, काहींचे बांधकाम अर्धवट आहे तर काहींनी व्याजाने पैसे काढून बांधकाम सुरू केले.

अनुदानासाठी अनेकवेळा आंदोलने, मोर्चे काढणत आले. पालिकेच्या अधिकारी व पदाधिकार्‍यांनी फक्त आश्वासने दिली, प्रत्येक्षात काही नाही. अतिवृष्टीमुळे लोकांना राहण्यासाठी अन्यत्र आश्रय घ्यावा लागला, गोरगरीब वर्गातील लोकांचा आज संताप उफाळून येऊन पालिका कारभार, पदाधिकार्‍यांसह, लोक प्रतिनिधींची टक्केवारी पद्धत, ठेकेदार राज, गावातील घाणीचे साम्राज्य, जॉगिंग पार्कचे चुकीचे काम या मुद्यांवरून विविध वक्त्यांनी चांगलेच तोंड सुख घेतले.

आंदोलनाचे नेतृत्व आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक किसन आव्हाड, सुनील पाखरे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अरविंद सोनटक्के आदींनी केले. आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून आंदोलक वाजत गाजत पालिकेचा निषेध करत बाजार पेठेतून कार्यालयात गेले. येथे जोरदार घोषणाबाजीनंतर प्रमुख नेत्यांनी भाषणे केली.

यावेळी सुनील पाखरे म्हणाले, कमीशन खाऊन तुमच्या ढेर्‍या व गाल वाढले. वैयक्तिक जीवनाबद्दल बोलणे टाळले. तरी तुम्ही, तुमचे दलाल व ठेकेदार काय उद्योग करता याची सर्व कल्पना आहे. पालिकेत चरताना सर्वसामान्य जनतेचा विचार करा, ठेकेदारांचे बोट धरत चालू असेलल्या दलालांना पेव्हींग ब्लॉक, रस्ते यातच रस आहे. ज्या झोपडीतून तुमचा कारभार चालतो, तेथे पुढील आंदोलन होईल. जनतेची कामे होत नसतील तर फड काढा. आमदारांना निव्वळ डोळे झाकून गप्प बसण्यामागचे गुपीत लोकांपुढे उघडे करण्याची वेळ आली आहे.

यावेळी अरविंद सोनटक्के, किसन आव्हाड यांची भाषणे झाली. मुख्य अधिकारी धनंजय कोळेकर व कार्यालयीन अधीक्षक आयुब सय्यद यांनी आंदोलकांशी चर्चा करत सर्व पातळ्यांवर पाठपुरवठा करत डिसेंबरअखेर थकीत हप्ते देण्याचे आश्वासन दिले. लोकप्रतिनिधींवर टीका करण्यावरून मोर्चातील सलीम शेख व आंदोलकांची किरकोळ शाब्दिक चकमक उडाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या