Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

ज्येष्ठ नेते व माजी खासदार दादापाटील शेळके यांचे निधन

Share

खारेकर्जुनेत आज अंत्यसंस्कार

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद सदस्य ते खासदार असा झंझावाती प्रवास करणारे जिल्ह्यातील ज्येष्ठनेते, माजी खासदार मारुती देवराम उर्फ दादापाटील शेळके (वय 78) यांचे काल शुक्रवारी सायंकाळी अल्पशा आजाराने अहमदनगर येथील नोबल हॉस्पिटल येथे निधन झाले. त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा अंत्यविधी तालुक्यातील खारे खर्जुने येथे आज शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे. दादापाटील अतुलनीय होते. पुन्हा असा नेता होणार नाही अशा भावना त्यांच्या जाण्याने व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक असलेले पुत्र रावसाहेब व तीन मुली, असा परिवार आहे. 2 ऑगस्ट 1941 रोजी दादापाटलांचा नगर तालुक्यातील खारे कर्जुने येथे जन्म झाला. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश करून ते प्रथम जिल्हा परिषद सदस्य (1962 ते 1978) झाले.

त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा आलेख उंचावताच राहिला. 1978 ते 1994 या दरम्यान ते चार वेळा आमदार होते. तसेच दोन वेळा खासदार झाले. तत्पूर्वी नगर तालुका पंचायत समितीचे उपसभापती, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्र रोजगार हमी योजना समितीचे सदस्य, नगर तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष, नगर तालुका दूध संघाचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे सदस्य, नगर तालुका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असे विविध पदे भुषविली. दादा पाटलांनी नगर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यात म्हणजे वाळकी येथे सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. अवघ्या आठ महिन्यांत कारखाना उभा करून त्यांनी 2001मध्ये पहिला गळीत हंगाम सुरू केला होता.

शेती व उसाच्या प्रश्‍नांबाबतचा त्यांचा अभ्यास वाखाणण्याजोगा होता. त्यांनी नगर तालुक्यात साधारण 30 महाविद्यालये स्थापन करून स्थानिक संस्थांकडे सुपूर्द केली. खासदार व आमदार असतानाही ते गरीबांच्या थेट झोपडीत जाऊन जेवण करीत. सर्वसामान्य राहणी व सर्वसामान्य शेतकर्‍यांत मिसळून राहणे, हे दादा पाटील यांचे वैशिष्ट्य होय. अनेक पदे भूषवूनही त्यांच्या पेहरावात तसुभरही फरक पडला नाही. नगर बाजार समितीच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता. नगर जिल्ह्यात सर्वात प्रथम पिक विम्या बाबत दादा पाटील यांनी जनजागृती केली आणि तो मिळवून दिला. नगर जिल्ह्यात सर्वात प्रथम पिक विम्याबाबत दादा पाटील यांनी जनजागृती केली आणि तो मिळवून दिला. अफाट लोकसंग्रह असलेल्या या नेत्याचे चाहते सर्वच पक्षात आहेत. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केले. त्यावेळी आलेली मंत्रिपदाची ऑफर धुडकावली. वसंतदादांसह अंतुले, निलंगेकर, शरद पवार या सर्व मुख्यमंत्र्यांबरोबरही त्यांना काम करण्याची संधी मिळाली.

दादा पाटील शेळके यांचा जीवनपट
– जन्म – 2 ऑगस्ट 1941
– गाव – खारेकर्जुने (ता. नगर)
– शिक्षण – एस.एस.सी.
– चार वेळा आमदार (1978 ते 94)
– दोनदा खासदार (1994 व 1996)

भूषविलेली पदे
– सदस्य, जिल्हा परिषद (1962-78)
– उपसभापती, पंचायत समिती, नगर (1962-64)
– सभापती, पंचायत समिती, नगर (1966-67)
– अध्यक्ष, जिल्हा सहकारी बँक (1991)
– सदस्य, रोजगार हमी योजना समिती, महाराष्ट्र
– अध्यक्ष, नगर तालुका देखरेख संघ
– अध्यक्ष, नगर तालुका सहकारी दूध संघ
– सदस्य, उत्तर विभागीय सल्लागार समिती, रयत शिक्षण संस्था
– अध्यक्ष, नगर तालुका सहकारी साखर कारखाना

स्थापन केलेल्या संस्था
– खारेकर्जुने विविध सहकारी संस्था
– लोकहितवादी शिक्षण संस्था
– नगर तालुका सहकारी साखर कारखाना
– नगर तालुका सहकारी दूध संघ
– नगर तालुका सहकारी दूधउत्पादक पतसंस्था
– सीना वाहतूक सहकारी संस्था

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!