लंकेंनी फुंकले विधानसभा निवडणुकीचे रणशिंग

0
सुपा (वार्ताहर) – मला कुठलाही राजकीय वारसा नसल्याने भविष्यात संघर्ष हा अटळ आहे. माझा जन्मच संघर्षातून झाला आहे. राजकारणातील घराणेशाहीची मक्तेदारी मोडित काढण्यासाठी मी प्रयत्न करणार असून यासाठी तुमच्या पाठिंब्याची मला गरज आहे. मी आजही शिवसेनेचाच असून निष्ठावंत शिवसैनिक आहे, मला कोणी निष्ठा शिकवण्याची गरज नाही. मला कुठल्याही प्रकारचा पक्षाचा निरोप आला नाही. यापुढे तुम्हा जनता जनार्धनांना विचारल्याशिवाय कोणताच निर्णय घेणार नसल्याचे निलेश लंके यांनी जाहीर करत, ‘ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी हे’ असे म्हणत विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
तालुक्यातील हंगा येथे वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना निलेश लंके बोलत होते. यावेळी जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ, संदेश कार्ले, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अनिल कराळे, पुणे जि. प. सदस्य राजू जगदाळे, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, शिवव्याख्याते गणेश शिंदे, माजी सभापती सुदाम पवार, नगर पंचायत समिती सभापती रामदास भोर, उल्हासनगर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देवराम ठुबे, युवासेना तालुका प्रमुख राहुल झावरे, अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास गोल्हार, मुंबईचे माजी नगरसेवक कोंडिभाऊ तिकोणे, बाबासाहेब तरटे, संजय मते, वाघुंड्याचे सरपंच संदीप मगर, शिवसेना उपतालुकाप्रमुख दादा शिंदे, भोयरे गांगर्डाचे उपसरपंच दौलतराव गांगड, पाडळी रांजणगावचे माजी सरपंच विक्रमसिंह कळमकर, मुंबईचे पप्पू जासूद, समर्थ पॉलिटेक्नीकचे कैलास गाडिलकर यांच्यासह तालुक्यातील सर्व पक्षिय नेते, कार्यकर्ते, शिवसेना शाखा प्रमुख, युवासेना प्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे पारनेर दौर्‍यावर आले असता आयोजित मेळाव्यात घोषणाबाजी करत शक्तीप्रदर्शन केल्यामुळे पक्षशिस्त पाळली नाही म्हणून तालुका प्रमुख निलेश लंके यांना पदावरून हटवले. यामुळे लंके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेळाव्याकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र मेळाव्यातील गर्दीने उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या सभेचे रेकॉर्ड मोडित काढले. यावेळी निलेश लंके काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले असताना मी शिवसेनेतच असल्याचे सांगत पक्षाकडून कोणताही निरोप आला नसल्याचे सांगत सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करत राहणार, असे जाहीर केले. तालुक्यात बरेच जण कार्यक्रम घेतात मात्र स्टेजवरती फक्त कुटुंबच असते, असे म्हणत आमदार औटी यांचे नाव न घेता टीका केली.

गर्दीचा झाला उच्चांक – 
तालुक्यात एखाद्या नेत्याची सभा असल्यास समोर बसण्यासाठी गर्दीच नसते. ही गर्दी विकत घ्यावी लागते. मात्र लंके यांच्या वाढदिवसानिमित्त आठ दिवसांपासून तालुक्यात फ्लेक्स लावण्यासाठी तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात राबत होता. मेळाव्याच्या अधल्या दिवशी सुमारे 500 कार्यकर्ते नियोजनासाठी हंगा येथे उपस्थित होते. तालुक्यातील प्रत्येक गावातून उत्स्फूर्तपणे सर्वसामान्य माणूस आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी हंगा येथे उपस्थित होता. व्यासपिठावरही मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यामुळे पारनेर तालुक्यातील राजकारण्यांना चांगलाच धक्का बसल्याचे बोलले जात होते.

LEAVE A REPLY

*