Friday, May 3, 2024
Homeनगरपारनेरचे तत्कालीन पोलीस निरीक्षकांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

पारनेरचे तत्कालीन पोलीस निरीक्षकांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक येथील रेशनचा गहू काळ्या बाजारात विकल्याबाबतची तक्रार तत्कालीन पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी

- Advertisement -

दडपल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपिठाने पारनेर पोलीस निरिक्षकांना स्वतः न्यायालयासमोर हजर राहण्याचा आदेश 23 जानेवारी 2020 दिलेला होता. परंतु तेव्हा ते हजर राहिले नव्हते, नंतर पोलीस उपअधिक्षकांनीही या प्रकरणातील पारनेरचे तत्कालीन निरीक्षक हनुमंत गाडे, उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांच्यासह काही पोलीस कर्मचारी यांची चौकशी करून जबाब नोंदविले होते.

न्यायालयाने त्यांना पुन्हा मंगळवार दि. 5 जानेवारी 2021 ला तपासाच्या सर्व कागदपत्रांसह न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत वडनेर येथील लोकजागृती सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते दत्तात्रय मोहन पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

7 जानेवारी 2017 रात्री वडनेर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीमार्फत स्वस्त धान्य वितरण करणारे भागा खंडू बाबर हे रेशनचा गहू काळ्या बाजारात विकताना दत्तात्रय पवार यांनी पकडले व त्यांनी निघोज पोलिसांना कळवले. पोलिसांनी तक्रारदाराची तक्रार नोंदवून, मुद्देमालासह गहू विकत घेणार्‍या व त्यांच्याकडे रेशनकार्ड नसणार्‍या दोन ग्राहकांना ताब्यात घेऊन त्यांचे जबाब नोंदवले.

पारनेर तहसीलदारांना पकडलेला गहू रेशनचा असल्याची खात्री करण्यास सांगितले. तहसीलदारांनी हा पकडलेला गहू रेशनचा आहे किंवा नाही हे सांगता येत नाही, असा अहवाल दिला. त्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे व उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांनी पकडलेला मुद्देमाल सोडून देत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.

मुद्देमाल ताब्यात घेतल्यावेळी नोंदवलेल्या जबाबात हा गहू रेशनचाच असल्याचे स्पष्ट म्हणणे त्या ग्राहकांचे असल्याने याबाबत गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी तक्रारदार पवार यांनी वारंवार वरिष्ठांकडे केली परंतु त्याची दखल कोणीही न घेतल्याने त्यांनी अखेर उच्च न्यायालयात धाव घेतली. यापुर्वीच्या सुनावणीवेळी न्यायालयाने पारनेर पोलीस निरीक्षकांना न्यायालयात या प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

परंतु चौकशी अहवाल व प्रत्यक्ष हकीगत आणि पुरावे पाहता हा गहू सार्वजनिक वितरणासाठीचाच असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. त्यामुळे प्रत्यक्ष घटना व चौकशी अहवाल यात मोठी विसंगती असल्याने पोलीस निरीक्षकांनी तपासाच्या सर्व कागदपत्रांसह न्यायालयात स्वतः हजर राहण्याचे आदेश दिले होते; परंतु पोलीस न्यायालयात हजर राहत नाहीत.

रेशनचा गहू काळ्या बाजारात विकल्यामुळे जीवनावश्यक वस्तू अपहारप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा, या संबंधीचे प्रकरण दडपणार्‍या पोलीस अधिकारी यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी उच्च न्यायालयाकडे केलेली आहे. याबाबतची पुढील सुनावणी 5 जानेवारीला होणार आहे. न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्याय. एम. जी. शेवळीकर यांच्या खंडपीठासमोर याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. दत्तात्रय मरकड बाजू मांडत आहेत.

रंगेहाथ पकडलेला रेशनचा माल आहे, असे आरोपींनी कबुल करूनही त्याच्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे औरंगाबाद खंडपिठाकडे धाव घ्यावी लागली. शेवटी औरंगाबाद खंडपिठाच्या निर्णयाने दिलासा मिळाला. या घटनेतील आरोपी व त्यांना पाठीशी घालणारे यांच्यावर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे.

तक्रारदार : दत्तात्रय पवार, वडनेर बुद्रुक, ता. पारनेर.

- Advertisment -

ताज्या बातम्या