पेपर कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्‍यांचा लाखोंचा खर्च वाया जाण्याची भीती

0

नेवासा (प्रतिनिधी) – शेततळ्यासाठी आवश्यक मायक्रॉन पेपर पाठविण्यात व बसविण्यात संबंधित कंपनीकडून झालेल्या हलगर्जीपणाने लाखो रुपयांचा केलेला खर्च वाया जाण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे या कंपनीविरोधात ग्राहकमंचात दाद मागण्याच्या विचारात शेतकरी आहेत.

खरवंडी परिसरातील काही शेतकर्‍यांनी राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेला प्रतिसाद म्हणून उत्स्फूर्तपणे ऑनलाईन नाव नोंदणी करत उसनेपासने तसेच खाजगी व्यक्तीकडून कर्जाऊ पैसे उपलब्ध करुन शेततळ्याचे कामही सुरु केले.

पावसाळ्यापूर्वी शेततळे तयार झाल्यास पावसाच्या पाण्यात ते भरुन टंचाई काळात विशेषतः उन्हाळयात त्यातून उपलब्ध झालेल्या पाण्याने पिके जगवता येतील, या स्वप्नरंजनात शेतकरी होते. मात्र शेततळे खोदून शेवटच्या टप्प्यात आले तरीही शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी त्याकडे साधी चक्करही न मारल्याने या योजनेच्या खरेखोटेपणाबाबत शेतकरी साशंक बनले आहेत.

त्यातच या शेतकर्‍यांनी या शेततळ्यात पाणी साठून राहण्यासाठी खाली अंथरावयाच्या मायक्रॉन पेपरसाठी गुजरातमधील एका नामांकित कंपनीकडे ऑनलाईन बँकिंग प्रणालीद्वारे लाखो रुपयांची रक्कम आगाऊ स्वरुपात पाठवूनही या कंपनीने हलगर्जीपणा केल्यामुळे या शेतकर्‍यांनी केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

सदर कंपनीने हा मायक्रॉन पेपर पावसाळ्यापूर्वीच बसविणे आवश्यक असताना तसे न करता पाऊस सुरु झाल्यानंतर बसविण्यास सुरुवात केली. शिवाय हा कागद बसविण्यासाठी किमान वीस प्रशिक्षित, अनुभवी कारागीरांची गरज असताना सदर कंपनीने अवघा एक कारागीर पाठवला. पावसाची रिपरिप त्यात तज्ज्ञ कारागीरांची वानवा यामुळे संभाजी रामचंद्र मुरकुटे या शेतकर्‍याचा कागद शेततळ्यात अंथरल्यानंतर चिखलात फसून खराब होण्याच्या मार्गावर आहे.

खरवंडीतील इतरही शेतकर्‍यांनी लाखो रुपये खर्च करुन शेततळी खोदली. संबंधित कंपनीने मात्र पावसाळा सुरु झाल्यावर कागद पाठविल्यामुळे आता त्याच्याकडे पाहत राहणे इतकेच शेतकर्‍यांच्या हातात राहीले आहे. शेततळ्याच्या खोदाईनंतर त्वरीत त्यात हा मायक्रॉन पेपर अंथरणे आवश्यक असताना तसे न झाल्यामुळे केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया जाण्याचे नवीनच संकट या शेतकर्‍यांसमोर उभे राहिले आहे.

ग्राहक मंचात दाद मागणार  ग्राहक मंचात दाद मागणार   मायक्रॉन पेपरसाठी गुजरातमधील नामांकित कंपनीला लाखो रुपये ऑनलाईन बँकिंग प्रणालीद्वारे आगाऊ पाठविले. परंतु कंपनीच्या हलगर्जीपणामुळे पावसाळा सुरु झाल्यानंतर हा कागद आला. तो बसविण्यासाठी किमान 20 प्रशिक्षित कारागीरांची आवश्यकता असताना अवघा एक कारागीर पाठविला. माझ्या शेततळ्यात हा कागद आता चिखलात रुतला असून लाखो रुपयांचा केलेला खर्च वाया जाण्याची चिन्हे दिसत असल्यामुळे संबंधित कंपनीला ग्राहक मंचात खेचणार आहे.  संभाजी मुरकुटे  (शेतकरी, खरवंडी)

LEAVE A REPLY

*