Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

पाणलोटात धुव्वाधार

Share
  • घाटघर व रतनवाडीला पाच इंच पाऊस
  • पिंपळगाव भरले, वाकी भरण्याच्या मार्गावर

अकोले/भंडारदरा/कोतूळ (वार्ताहर) – मुळा-भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची धुव्वाधार बॅटिंग सुरू आहे. घाटघर व रतनवाडीला 24 तासांत प्रत्येकी पाच इंच पाऊस पडला. भंडारदरा धरणात पाण्याची आवक वाढली असून सायंकाळ पर्यंतच्या 24 तासांत धरणात 402 दलघफू पाणी आले. प्रवरेची उपनदी असणार्‍या कृष्णवंती नदीवरील वाकी धरण भरण्याच्या मार्गावर असून त्यानंतर निळवंडे धरणातही पाण्याची आवक सुरू होईल. संततधार पावसामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर पावसात चिंब भिजण्यासाठी भंडारदरा-घाटघर परिसरात पर्यटकांची गर्दीही वाढू लागली आहे. हरिच्छंद्रगड परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. मुळा नदीवरील 600 दलघफू क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण शनिवारी दुपारी भरून वाहू लागले आहे. त्यामुळे मुळा नदी वाहती झाली आहे. पावसाचा जोर टिकून राहिल्यास रविवारी मुळा धरणात पाण्याची नवीन आवक सुरू होईल.

जूनच्या शेवटच्या आठवड्यात मूळा-भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाचे आगमन झाले.दोन तीन दिवस चांगला पाऊस पडला पण नंतर पावसाचा जोर एकदमच ओसरला. शुक्रवार पासून मात्र पुन्हा पावसास सुरुवात झाली. शनिवारी ही दिवसभर पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत होता.या पावसामुळे पाणलोट क्षेत्रातील ओढे नाले पुन्हा जोमाने वाहू लागले आहे.धरणात होणारी पाण्याची आवक त्यामुळे वाढली आहे. शनिवारी सायं.पर्यंतच्या 24 तासात भंडारदरा धरणात 402 दलघफु नवीन पाण्याची आवक झाली.सायं. भंडारदरा धरणातील पाणीसाठा 1 हजार 372 दलघफु झाला होता.सकाळी 6 वाजता धरणात 1 हजार 92 दलघफु पाणीसाठा होता. घाटघर-भंडारदर्‍यात शनिवारी मुसळधार पाऊस सुरू होता.दिवस भराच्या 12 तासात भंडारदरा येथे 65 मिली मीटर तर घाटघर येथे 95 मिली मीटर पावसाची नोंद झाली.याच कालावधीत धरणात 280 दलघफु नवीन पाणी आले.रात्रीतून धरणातील पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे.अशी माहिती भंडारदरा धरण शाखेचे सहाय्यक अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली.

संततधार पाऊस आणि वातावरणातील वाढलेला गारठा यामुळे आदिवासी भागातील जनजीवन गारठले आहे.ओढे नाले दुथडी भरून वाहत आहे.भात खाचरे पाण्याने तुडुंब भरली आहे.डोंगर कड्या वरून लहान मोठे धबधबे फेसाळत कोसळत आहे. भंडारदर्‍याच्या पावसात चिंब भिजण्यासाठी आणि पावसाळी भंडारदर्‍याचे रूप न्याहाळण्यासाठी भंडारदरा-घाटघर परिसरात रविवारच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रा बाहेरही चांगला पाऊस सुरू आहे.वाकी परिसरात पडत असणार्‍या पावसा मुळे वाकी धरण भरण्याच्या मार्गावर आहे.हे धरण भरल्या नंतर कृष्णवंती नदी वाहती होईल आणि त्यानंतर निळवंडे धरणात पाण्याची आवक सुरू होईल.

अकोले तालुक्याच्या पूर्व भागातही आषाढ सरींची दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे.खरीप हंगामाच्या दृष्टीने हा पाऊस उपयुक्त आहे.सतत पडणारा पाऊस,हवेत निर्माण झालेला गारठा,त्याचा परिणाम अकोले शहरातील दैनंदिन व्यवहारावरही झाल्याचे जाणवले.शनिवारी दिवसभर शहरात नेहमीच्या तुलनेत खूपच कमी वर्दळ जाणवत होती. तालुक्याच्या उत्तर भागातील आढळा पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाचे प्रमाण खुपच कमी आहे.आढळा नदी ही अद्याप वाहती झालेली नाही.त्यामुळे आढळा धारणातही नवीन पाण्याची आवक सुरू झालेली नाही.

कोतुळ वार्ताहराने कळविल्यानुसार मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण शनिवारी दुपारी 12 वाजता ओव्हर फ्लो झाले. मुळा नदी पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून पाऊस सुरू असल्याने उगमावरील 193 दलघफु क्षमतेचे अंबित धरण भरल्या नंतर पिंपळगाव खांड मध्ये पाण्याची आवक सुरू झाली. पावसाच्या हुलकवणीने धरण भरण्यास अडथळे येत होते. शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढल्याने धरणात आवक वाढली. यामुळे शनिवारी दुपारी 12 वाजता धरण भरून वाहू लागले. यामुळे धरणाचे खालील बाजूस मुळा नदी वाहती झाली आहे व पाण्याचा प्रवाह आता मुळा धरणाकडे झेपावला आहे .

अंबित पाठोपाठ मुळा नदीवरील 600 दलघफु साठवण क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण भरले. राहुरी व नगर शहराची तहान भागविणार्‍या 26 दलघफु क्षमतेचे व जिल्ह्यात सर्वात मोठ्या मुळा धरणाचा साठा 18 टक्केपर्यंत खालावला होता. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी चिंतातूर होते. मात्र मुळानदी प्रवाही झाल्याने शेतकरी आनंदीत झाले आहे. पिंपळगावखांड धरणाच्या भिंतीवरून 2 हजार 500 क्यूसेकने पाणी नदीपात्रात वाहत आहे. पाट बंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता रामनाथ आरोटे, शाखा अभियंता नानासाहेब खर्डे धरण पातळीवर लक्ष ठेवून आहेत. दुपारी मूळा नदीचे पाणी संगमनेर तालुक्यातील घरगावपर्यंत पोहचले होते. रात्री उशिरा ते राहुरी तालुक्यातील मुळा धरणात पोहचण्याची शक्यता आहे.
.
शनिवारी सकाळपर्यंत 24 तासातील पाऊस घाटघर-122,रतनवाडी-122,पांजरे-109,भंडारदरा-97,वाकी-62,आढळा- 4,अकोले -24,कोतुळ -22 (आकडे मिलिमीटरमध्ये)

‘दारणा’त 24 तासांत 313 दलघफू नवीन पाणी

अस्तगाव (वार्ताहर) – दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्राबरोबरच काल शनिवारी गंगापूरच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने दमदार आगमन केले. काल सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत अधूनमधून जोरदार सरी बरसल्या. दोन दिवसांपासून बरसत असलेल्या जोरदार पावसाने काल शनिवारी सकाळी सहापर्यंत दारणात 313 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. त्यामुळे दारणाचा साठा सव्वा टीएमसी हून अधिक झाला होता. रात्री उशिरा तो दीड टीएमसी पर्यंत गेला असेल.

दारणाच्या पाणलोटातील घोटी, इगतपुरी, भावली परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पाणी दारणाच्या दिशने खळखळत येत असल्याने या धरणाची कूस हळूहळू उजवू लागली आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत इगतपुरी ला 91 मिमी, भावली 125 मिमी, घोटीला 62 मिमी, पावसाची नोंद झाली. शुक्रवारी दिवभरातील पावसाने 313 दलघफू पाणी दारणात दाखल झाले आहे. भावलीत 78 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. 1434 दलघफू क्षमतेच्या भावलीत 288 दलघफू नवीन पाणी दाखल झाले आहे.

पावसापुर्वी उपयुक्त साठा शुन्य होता. आता तो 288 दलघफू इतका झाला आहे. काल शनिवारी सकाळ पासुन दारणा तसेच भावली च्या पाणलोटात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे आज सकाळ पर्यंत दारणात दिड टिएमसी हून पाणी साठा झाला असेल. इगतपूरी, घोटी परिसरातील छोट्या मोठ्या उपनद्या, ओढे यांचे पाणी दारणाकडे वाहु लागले आहेत. 7149 दशलक्षघनफूट क्षमतेच्या दारणात काल सकाळ पर्यंत 1338 दलघफू (18.72 टक्के) पाणी साठा झाला आहे. गंगापूर धरण क्षेत्रात शुक्रवारी दिवसभर पावसाने अधुन मधुन जोरदार हजेरी लावली.

काल शनिवारीही अधुन मधुन जोरदार हजेरी लावली. या धरणाच्या जलाशयात नविन अल्प पाणी दाखल झाले असेल, परंतु नाशिक महानगरपालिका, औद्योगिक वसाहत हे 16 दलघफू दररोज पाणी उपसत असल्याने या नविन पाण्याचा परिणाम अद्याप दिसत नाही. मात्र मुसळधार पावसाने जलाशयात वाढ होईल. काल सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत 12 तासात गंगापूरला 46 मिमी, आंबोली येथे 78 मिमी, गौतमी 33 मिमी, त्रंबक येथे 20 मिमी पावसाची नोंद झाली. त्या आगोदर काल सकाळी संपलेल्या 24 तासात गंगापूरला 72 मिमी, अंबोली येथे 85 मिमी, गौतमी येथे 48 मिमी, काश्यपीला 47 मिमी, त्रंबकला 10 मिमी पावसाची नोंद झाली होती. 5630 क्षमतेच्या गंगापूर धरणात काल सकाळ पर्यंत 752 दलघफू (13.35 टक्के) पाणी साठा होता. गंगापूर समुहातील काश्यपी धरण 5.66 टक्के, गौतमी 4.88 टक्के, पाणी साठ्यावर स्थिर आहेत.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!