Type to search

Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

पाणी पुरीच्या पाण्यात चक्क अळ्या !

Share

नगरकरांच्या आरोग्याशी खेळ : मनपा आणि अन्न प्रशासन विभागाचा डोळे झाकपणा

अहमदनगर (प्रतिनिधी)– शहरातील नेप्ती नाक्यावरील चौकात पाणीपुरीच्या पाण्यात चक्क अळ्या आढळून आल्या आहेत. शहरातील हातगाडी व्यावसायिकांची महापालिका आरोग्य विभाग व अन्न व औषध प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची तपासणी होत नाही. त्यामुळेच आता नागरिकांनीच सावध राहण्याची वेळ आली आहे. यापूर्वी गेल्या महिन्यांत शहरातील एका नमकीनच्या दुकानात असा प्रकारसमोर आला होता. त्यावेळी मनपा आणि अन्न प्रशासन विभागाने डोळेझाकपणा केला होता.

शहरातील नेप्ती नाका येथे काही नागरिक हातगाडीवर पाणीपुरी खाण्यासाठी गेलेे. त्यावेळी पुरीतील पाण्यात एका ग्राहकाला अळ्या आढळून आल्या. हा प्रकार लक्षात येताच ग्राहकांनी पाणीपुरीवाल्याला पाणी फेकून देण्यास भाग पाडले. शहरात प्रत्येक चौकात जागोजागी अशा पाणीपुरीच्या गाड्या असून, रस्त्यावरच पाणीपुरीची विक्री केली जाते. मात्र, त्यांची स्वच्छता व पाणी उपलब्धतेबाबत कधीही कोणी पाहत नसल्याने अशा लोकांचं नेहमीच फावत आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या या हातगाडी चालकांविरुद्ध कुणीही कारवाई करताना दिसत नाही. महानगरपालिकेचा आरोग्य विभाग अथवा अन्न औषध प्रशासन यांनी कधीही अशा गाड्यांची तपासणी केली अथवा कारवाई केल्याचे ऐकवित नाही. त्यामुळे असे घाणेरडे पाणी नागरिकांना देण्याची हिंमत विक्रेत्यांची वाढत चालली आहे.

नेप्ती नाक्यावरील चौकात अळ्या आढळल्यानंतर तेथील पाणीपुरीवाल्याने आपले पाणी फेकून देत आपली चूक असल्याचे कबूल केले. मात्र, असे अनेक पाणीपुरीवाले दररोज नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. मात्र झोपलेला महापालिकेचा आरोग्य विभाग व अन्न औषध प्रशासन नेमकं काय करते, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरात उघड्यावर विक्री होणार्‍या अन्न पदार्थ, पाणी पुरी, वडा पाव यांना महापालिका प्रशासनाने परवानगी दिलेली आहे की नाही, याची कोणतीच माहिती दिली जात नाही. यासाठी स्वतंत्रपणे अन्न-औषध प्रशासन विभाग कार्यरत असून हा विभाग काय कारवाई करतो की नाही, हा संशोधनाचा विषय आहे. उघड्यावर असणारे दूषित अन्न पदार्थामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याला महापालिका आणि अन्न औषध प्रशासन विभाग जबाबदार राहील, अशी प्रक्रिया गणेश शिंदे यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!