पांगरमल दारुकांड : जिल्हा रुग्णालयातील चौघांचे निलंबन

0

विषारी दारूची उशिराने कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी) – सिव्हील हॉस्पिटलच्या आवारात विषारी दारूअड्डा सुरू असल्याचा ठपका ठेवत तत्कालीन सिव्हील सर्जनसह चौघांचे निलंबन करण्यात आले आहे. आरोग्य संचालनालयाने मंगळवारी रात्री निलंबनाचे आदेश काढले. नगर सिव्हील हॉस्पिटलला ते मंगळवारी रात्री प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तत्कालीन सिव्हील सर्जन एस.एम.सोनवणे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक पी.एस.कांबळे, प्रशासकीय अधिकारी रमेश माने, संजय राठोड असे निलंबित करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक काळात जिल्ह्यात विषारी दारूकांड घडले. पांगरमल, नेवासा येथील 12 जणांचा बळी या विषारी दारूने घेतला. या दारूकांडात एक्साईजचे सहा तर पोलीस दलातील चौघांचे निलंबन करण्यात आले. मात्र ज्या सिव्हील हॉस्पिटलच्या आवारातून ही विषारी दारू वितरीत केली जात होती, त्या हॉस्पिटलच्या एकाही अधिकार्‍यावर कारवाई झाली नव्हती.

सिव्हील हॉस्पिटलच्या अधिकार्‍यांवर कारवाईचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे प्रलंबित होता. दरम्यान विषारी दारूकांडातील 20 आरोपीविरोधात सव्वादोन हजार पानांचे दोषारोपपत्र कोर्टात दाखल करण्यात आले असून त्यात 163 जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या आहेत. इतकं सगळं घडूनही सिव्हीलच्या अधिकार्‍यांवर कोणतीच कारवाई झाली नव्हती.

दोन दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री दीपक सावंत त्यानंतर आरोग्य उपसंचालक कंधेवाड यांनी नगर जिल्हा रुग्णालयास भेट देऊन झाडाझडती घेतली. त्यानंतर आरोग्य विभागाकडे प्रलंबित असलेला प्रस्तावही तत्काळ निकाली निघाला. पांगरमल विषारी दारूकांडातील दारू ही सिव्हील हॉस्पिटलच्या कॅन्टीनमधून वितरत केली जात होती. सिव्हील हॉस्पिटलच्या आवारातच ती तयार केली जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. मंगळवारी रात्री उशिराने आरोग्य विभागाने सिव्हील हॉस्पिटलच्या चौघांचे निलंबनाचे आदेश काढले.

मंत्र्यांच्या भेटीनंतर 48 तासांत ऑर्डर
विषारी दारूकांड घडून वर्ष उलटले तरीही सिव्हील हॉस्पिटलच्या एकाही जणावर कारवाई झाली नव्हती. आरोग्य विभागाकडे कारवाईचा प्रस्ताव प्रलंबित होता. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी भेट दिल्यानंतर दुसर्‍याच दिवशी चौघांच्या निलंबनाचे आदेश निघाले.

LEAVE A REPLY

*