फलक लावण्यावरून संस्थान व परिवहन मंडळात मतभेद

0

बसस्थानकात परिवहन मंडळाने लावलेले फलक संस्थानने हटविले

शिर्डी (प्रतिनिधी)- साईबाबांमुळे जगाच्या नकाशावर झळकलेल्या शिर्डीत हजारो भक्त दररोज दाखल होतात. या भक्तांच्या सुविधेसाठी परिवहन मंडळाच्या जागेवर साईसंस्थानचे कोट्यवधी रुपये खर्च करून अद्ययावत बसस्थानकाची उभारणी केली. बसस्थानक प्रवाशासाठी खुलेही झाले मात्र गाडी लावण्याच्या फलटावर मार्गाचे फलक लावण्यावरून संस्थान व परिवहन मंडळात मतभेद निर्माण झाले. परिवहन मंडळाने लावलेले फलक संस्थानने काढून टाकल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. दोघांच्या वादात प्रवाशांची कुचंबना होत आहे.
शिर्डीत येणार्‍या साईभक्तांची संख्या लक्षात घेऊन परिवहन महामंडळाने अद्ययावत बनस्थानक उभारण्यासाठी साईसंस्थानची मदत घेतली. एसटीची जागा व संस्थानचा पैसा असे मिळून शिर्डीत तीन मजली भव्य बसस्थानक उभारण्यात आले. सद्यस्थितीत हे बसस्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहे. मात्र फलटावर उभ्या असलेल्या गाड्या ज्या मार्गावर जाणार आहेत त्यासंबंधी माहिती देणारे फलक अद्याप लावलेले नाहीत. हे फलक लावण्यावरून परिवहन मंडळ व साईसंस्थान यांच्यात मतभेद दिसून येत आहेत.
परिवहन मंडळाने ‘ओपो’ मोबाईल कंपनीने दिलेले फलक प्रत्येक फलटावर लावले. त्यावर संस्थानने हे फलक हटविण्याचे लेखी आदेश आगार प्रमुखांना काढले. हे फलक साईसंस्थान लावणार असल्याचे आगारप्रमुखांना कळविले. त्यामुळे लावलेले फलक काढून टाकण्यात आले. दोन महिने उलटूनही संस्थानने अद्याप हे फलक लावलेले नाहीत. त्यामुळे येणारी गाडी कोणत्या मार्गावर जाणार आहे याची माहीती घेण्यासाठी भक्तांना गाडीची पाटी पाहण्यासाठी प्रत्येकवेळी धावपळ करावी लागत आहे.
यात अपघाताचाही धोका निर्माण झाला आहे. श्रेयवादाच्या लढ्यात संस्थान व परिवहन मंडळाने प्रवाशांचा जीव धोक्यात घातला आहे. अनेकवेळा गाडी थांबून निघूनही जाते तरीही माहिती मिळत नाही. अशा प्रवाशांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे बसस्थानकाच्या फलटावर मार्गाचे फलक बसवावेत अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

बसस्थानकात दररोज 600 ते 700 गाड्या ये-जा करतात. यात परराज्यातील गाड्यांचा समावेश आहे. परराज्यातील भाविकांसह राज्यातून सुमारे 5 ते 6 हजार प्रवाशी येथे येतात. त्यांना परतीच्या प्रवासात फलक नसल्याने गाडी शोधण्यासाठी कसरत करावी लागते.

दिशादर्शक बोर्ड ‘ओेपो’ कंपनीकडून मिळाले होते. मात्र संस्थान प्रशासनाने त्यावर हारकत घेत ते काढून टाकण्याचे लेखी आदेश दिले. त्यामुळे ते हटविले मात्र दोन महिने उलटूनही संस्थानने ते फलक न दिल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. संस्थानला इतरांनी दिलेल्या देणग्या चालतात मग परिवहन मंडळाला देणगी स्वरूपात दिलेले ‘ओपो’चे फलक का चालले नाहीत? असा प्रश्‍न परिवहन मंडळाने उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

*