Type to search

Blog : जगाचे शांतीदूत पंडीत नेहरू

ब्लॉग

Blog : जगाचे शांतीदूत पंडीत नेहरू

Share
भारतात लोकशाही समाजवादाचा पाया घालणारे थोर शिल्पकार आणि जगाला शांततेचे महत्व सांगणारे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची आज आज जयंती.

सुखी, समृद्ध आणि ऐश्वर्यसंपन्न अश्या नेहरू घराण्यात दिनांक 14 नोव्हेंबर 1889 रोजी पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू वकिलीचा व्यवसाय करीत होते. जवाहरलाल यांना बाहेरील विषम वातावरणाचा संबंध येवू नये यासाठी त्यांचे प्राथमिक शिक्षण इंग्रज गवर्नेसच्या देखरेखीखाली घरीच पूर्ण करण्यात आले.

त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना विदेशात पाठविण्यात आले. बैरिस्टरची पदवी मिळवून ते भारतात परतले. विदेशात शिक्षण घेताना जॉन स्टुअर्ट मिल, ग्लैडस्टन, जॉन मोर्ले इत्यादी विचारवंत लेखकांच्या पुस्तक वाचनातून त्यांना राजकीय व सामाजिक जीवनाची माहिती मिळाली. रसेलच्या वाचनातून त्यांनी मानवतावाद आत्मसात केले तर बर्नाड शॉ यांच्यामुळे ते समाजवादी बनले. सन 1916 मध्ये त्यांचा विवाह कमला कौर यांच्याशी झाला.

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी ह्या त्यांच्या एकुलती एक कन्या होत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात असताना इंदिराजींना लिहिलेली पत्रे आजही प्रसिध्द आहेत. त्यांच्या पत्रव्यवहारातूनच इंदिराजीचे व्यक्तिमत्व घडले असे म्हणणे अतिशयोक्तिचे ठरणार नाही.

पं. नेहरुनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात लोकमान्य टिळक आणि अॅनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीतून केली. महात्मा गांधीजींच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्या राजकीय कार्याला व्यापक बैठक व निश्चित अशी दिशा मिळाली. सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी आणि पंडीत नेहरू या त्रिकुटामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले. पंडीत नेहरू हे गांधीजीचे आवडते शिष्य होते.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण? या प्रश्नांची उकल गांधीजीनी पंडीत नेहरू यांची निवड करून चुटकीसरशी सोडविली. ही निवड सार्थ ठरविताना पंडीत नेहरू यांनी सलग बारा वर्षे पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली. भारत स्वतंत्र होत असताना निर्वासितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, काश्मीरचा प्रश्न, हैद्राबादवरील निजाम आणि गोव्यातील पोर्तुगीज यांच्या विरुद्ध कारवाईचा प्रश्न यासारख्या समस्या त्यांनी सोडविल्या.

देशात लोकशाही समाजवादाचा पाया घालताना पंचवार्षिक योजनेची सुरुवात केली आणि शेती व उद्योगधंद्यास चालना देवून देशाला प्रगती पथावर नेण्याचे काम त्यांनी आपल्या करकिर्दीत केले.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांना अनेकवेळा तुरुंगवास भोगावा लागला. बेचाळीसच्या लढ्यात त्यांना अहमदनगरच्या तुरुंगात तीन वर्षे काढावे लागले. याच काळात त्यांनी जगप्रसिध्द अशी ऐतिहासिक कादंबरी डिस्कवरी ऑफ इंडिया ( भारत एक खोज ) आणि ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे ग्रंथ लिहून काढले.

कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण भारतभ्रमण केले. या प्रवासात त्यांना भारतातील गरिबी आणि दारिद्रय फार जवळून पाहायला मिळाले. या जनतेचे दारिद्रय दूर केले नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे असे त्यांनी त्यावेळीच ठरविले. समाजातील प्रत्येक व्यक्तीला महत्त्व आहे आणि तिला पूर्ण विकासाची संधी द्यायला हवी असा त्यांचा आग्रह होता.

आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेने सोडविण्याच्या दृष्टीने त्यांनी जगासमोर पंचशील तत्वे मांडली. त्यांच्या या विचाराचा गौरव करून त्यांना शांतीदूत ( एंजेल ऑफ पीस ) पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामुळे जगात भारत देशाची एक वेगळीच छाप पाडण्यात ते यशस्वी झाले.

पंडीत नेहरू यांना जीवनात फक्त दोनच गोष्टीचे विशेष असे आकर्षण होते, एक म्हणजे गुलाबाचे फुल आणि दुसरे म्हणजे लहान मूल. गुलाबाच्या फुलाच्या सुगंधाप्रमाणे त्यांचे कार्य सर्वत्र दरवळत राहिले. मुलांवर त्यांचे खुप प्रेम होते म्हणून लहान मुलांचे ते चाचा नेहरू बनले. त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो.

पंडीत नेहरू किती हळव्या मनाचे होते हे एका अनुभवावरुन सिध्द होते, सन 1962 च्या भारत-चीन युध्दाच्या वेळी भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गायिलेल्या कवी प्रदीप यांच्या ए मेरे वतन के लोगो हे गीत ऐकून नेहरूजींच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते, असा अनुभव वाचण्यास मिळतो. याच युध्दाच्या धकाधकीतून ते सावरले नाहीत आणि अखेर 27 मे 1964 रोजी हा तेजस्वी तारा निखळला.

त्यांनी आपली शेवटची ईच्छा लिहिली होती की, माझ्या देहाची मूठभर रक्षा गंगेत टाकावी, तेथून ती उंच आकाशात न्यावी, जिथे शेतकरी काम करतो त्या शेतात पडावी. माझ्या देहाचा कणनकण मातृभूमीच्या मातीशी एकरूप व्हावी, हीच माझी अखेरची ईच्छा आहे. पं. नेहरूच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन..!

– नागोराव सा. येवतीकर, प्राथमिक शिक्षक, मु. येवती ता. धर्माबाद, 9423625769

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!