पंचवटीतील अत्याचाराने महिला सुरक्षेसोबतच गुंड रिक्षाचालकांचाही प्रश्न ऐरणीवर

0

देशदूत डिजिटल विशेष

ऐन संध्याकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास कन्नमवार पुलासारख्या वर्दळीच्या ठिकाणाहून रिक्षात बसलेल्या महिलेवर महामार्गालगतच असलेल्या पंचवटी एसटी डेपोच्या भिंतीजवळ बेशुद्ध करून रिक्षाचालकाकडून अत्याचार केला जातो.

तेव्हा या घटनेने शहरात महिला सुरक्षित आहेत का? रिक्षाच्या व्यवसायात प्रवेश केलेल्या टग्या आणि गुंडांचा पोलिस खरेच बंदोबस्त करत आहेत का? मुजोर रिक्षाचालकांवरील कारवाईत पोलिसांनी ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष केलेय का? असे अनेक प्रश्न चव्हाट्यावर येत आहे.

ही घटना तीन दिवसांपूर्वीची आहे. मात्र त्याबाबत महिलेने वेळीच आवाज न उठवल्याने तोच प्रकार काल त्या रिक्षाचालकाने पुन्हा केल्याने तिने पोलिसांत धाव घेतली आणि या प्रकरणी आज सकाळी एका रिक्षाचालकाला अटक झाली.

खरे तर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शालीमार, सीबीएस, ठक्कर बाजार, रविवार कारंजा, पंचवटी अशा भागात भर रस्त्यावर मनमानी पद्धतीने रिक्षा उभ्या करणारे, प्रवाशाकडून तोंडाला येईल ते भाडे उकळणारे, प्रवाशांसोबत असभ्य वर्तन करणारे अशी येथील रिक्षाचालकांची नवीच ओळख झाली आहे.

यात काही चांगले रिक्षावाले अपवाद आहेत. मात्र अलिकडच्या काही वर्षात अनेक गुंडपुंडांनी रिक्षाच्या व्यवसायात प्रवेश केल्याने प्रवाशांचा त्रास वाढतोच आहे. यात प्रवाशांसोबत जे प्रामाणिक रिक्षाचालक आहेत, त्यांचाही त्रास वाढला आहे.

मात्र केवळ परवाना तपासणे आणि कधीतरी दंड करणे अशा किरकोळ दिखाऊ कामगिरीशिवाय पोलिस ठोस पाऊले उचलताना दिसून येत नाही. त्यामुळे लूटालूट करणे, हाणामारी करणे येथपासून तर आता महिलांवर अत्याचार करण्यापर्यंत काही रिक्षाचालकांची मजल गेल्याने रिक्षाने रोज हजारोंच्या संख्येने  प्रवास करणाऱ्या महिला आणि मुली खरेच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आता नाशिककरांच्या मनात भेडसावत आहे.

हा प्रश्न केवळ या घटनेपुरता मर्यादित नाही, तर त्याला व्यापक स्वरूप आहे. गेल्या काही दिवसांपासून साखळीचोर, भुरटे चोर, मोबाईल चोर यांचा त्रासही वाढला आहे. विशेषत: नाशिकमधील ज्येष्ठ महिलांना या चोरट्यांकडून लक्ष केले जात आहे.

दोन आठवड्यापूर्वी पंचवटीतील कृष्णनगर भागात सकाळी साडेसहाच्या दरम्यान एका ज्येष्ठ महिलेची साखळी अशीच एका चोराने पळवली. विशेष बाब जिथे ही घटना घडली, त्या परिसरात हाकेच्या अंतरावर आमदार बाळासाहेब सानप यांचे निवासस्थान आहे. आता लोकप्रतिनिधी राहतात त्याच परिसरात चोरटे न घाबरता आपले चौर्यकौशल्य दाखवित असतील, तर सामान्यांची काय कथा.

याच पंचवटी परिसरात वाघाडीजवळ गावठी दारूची निर्मिती होते, हे सर्वश्रुत आहे. अलिकडेच त्यावर पोलिसांनी धाड टाकलेली आहे. मात्र या दारूच्या व्यसनानेच अनेकांचे बळी घेतलेच शिवाय अनेकांना राक्षसही बनविले.

LEAVE A REPLY

*