Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकरोड रेल्वे स्टेशनमध्ये ‘पेड’ एसी वेटींग रूम; 15 डिसेंबरला लोकार्पण

Share

नाशिकरोड । संजय लोळगे

गतीमान रेल्वेसह प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासन सरसावले असून नाशिकरोड रेल्वेस्थानकात आऊटसोर्सिंग तत्वावर ‘पेड’ एसी वेटींग रूमची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दि. 15 डिसेंबर रोजी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण होणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. यानिमित्त येथील रेल्वे स्थानकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

भुसावळ विभागात सर्वात प्रथम नाशिकरोड रेल्वे स्थानकात वातानुकुलीत प्रतिक्षा कक्षाची उभारणी होत असल्याने प्रवाशांत समाधानाचे वातावरण आहे. दिल्ली, मुंबई, गोवा, नागपूर अशा मोजक्याच स्थानकात ‘पेड’ एसी वेटिंग रूमची सुविधा आहे. तिकीट बुकींग ऑफिसच्या वरच्या जागेत सर्व सोयीयुक्त ही रूम उभारली असून त्याची प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे.

नाशिकरोड हे ‘एनएसजी टू’ श्रेणीतील महत्वाचे रेल्वेस्थानक असून दररोज येथून किमान पंधरा हजार प्रवासी प्रवास करतात. धार्मिक व निसर्ग पर्यटनासह व्यावसायिक बैठकीसाठी येणार्‍या उच्चभ्रू श्रेणीतील प्रवाशांसह सामान्य नागरिकांना या विशेष सुविधेचा लाभ मिळणार आहे.


प्रस्तावित प्रतिक्षाकक्षाचे वैशिष्ट्य

प्रस्तावित एसी वेटींग रूम खासगी तत्वावर चालविण्यात देण्यात येणार असून रेल्वे प्रशासनाकडून केवळ जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या रूममध्ये सुमारे पन्नास प्रवाशांसाठी सोय असून 20 ते 50 रुपये प्रती तास आकारण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. प्रवाशांना कॉफी, कॅन्टिन, टीव्ही, स्वच्छतागृह आदी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येथे ध्वनी व वायु प्रदुषणाचा त्रास जाणवणार नाही.

एसी कोचमधून प्रवास करणार्‍या व्हीआयपी व्यक्तींसाठी ही रुम असली तरी जनरल कोचमधील सामान्य प्रवाशालाही शुल्क देऊन त्याचा लाभ घेता येणार आहे. तथापि, गर्दीच्या वेळी एसी कोचच्या प्रवाशांना प्राधान्य दिले जाईल. रेल्वेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनासुद्धा या सुविधाचा लाभ घेण्यासाठी शुल्क आकारावे लागणार आहे. भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी या जागेची पाहणी करून त्यात आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्यानंतर त्या अंमलात आणल्या आहेत.

कक्षाची सद्यस्थिती

येथील रेल्वेस्थानकात येणार्‍या विविध स्तरांतील प्रवाशांनी काढलेल्या तिकीटानुसार वेटींग रुमची सुविधा आहे. एसी कोचमधून प्रवास करणार्‍यांसाठी दोन एसी व दोन नॉन एसी रूम्स आहेत. चारपैकी दोन महिलांसाठीच आहे. पुरुष वेटींग रुमची क्षमता तीस प्रवाशांची तर महिला रुम्सची क्षमता अठराची आहे.

प्रवेशासाठी कर्मचार्‍याला तिकीट दाखवावे लागते. येथे मोबाईल चार्जिंग, एसी, स्वच्छतागृह एवढ्याच सुविधा आहेत. पाचवी वेटींग रुम बुकींग ऑफिस शेजारील मोकळ्या जागेत आहे. तिथे जनरल बोगीचे तिकीट असणार्‍यांना आराम करता येतो. त्यांच्यासाठी सिमेंटचे ओटे असून इतर सुविधा नाहीत. सुटीच्या काळात या वेटींग रुम्स फुल्ल असतात. त्यामुळे नवीन ‘पेड’ एसी वेटींग रूम उपयुक्त ठरणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!