Type to search

Featured दिवाळी विशेष - रिपोर्ताज

पद्म्नगर ते नाशिक

Share

पौराणिक ‘युग’ संकल्पनेनुसार चार युगात नाशिकला चार नावे असल्याचा श्लोक ब्रह्मपुराणात आला आहे.  त्यानुसार कृतयुगात (सत्ययुग) ब्रह्मदेवाने येथे पद्मासनात तपश्चर्या केली म्हणून ‘पद्मनगर’, द्वापारयुगात गौतमांनी हे ठिकाण लोकांना राहण्यायोग्य केले म्हणून ‘जनस्थान’, त्रेतायुगात  श्रीरामाने खर, दूषण आणि त्रिशर या तीन राक्षसांचा वध केला म्हणून ‘त्रिकंटक’ आणि लक्ष्मणाने शुर्पणखेचे नासिका छेदन केले म्हणून कलियुगात याला ‘नासिक्य’ अशी नावे या शहराला असल्याचे पुराणात उल्लेख आहे.

‘जनस्थान’ आणि ‘नाशिक’ अशी ओळख असलेल्या या शहराने केवळ देशातच नाही तर जागतिक स्तरावर आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवला आहे. गोदावरीची उत्पत्ती उत्तरेतील गंगेच्या आधीची असल्याने हिला ‘वृद्धगंगा’ असेही म्हणतात. जगातील प्राचीनतम ‘संस्कृती’ नदीच्या खोर्‍यातच बहरल्या, नांदल्या आणि तिथेच आपल्या अस्तित्वाच्या खुणा ठेऊन काळाच्या उदरात गडप झाल्या. नाशिक शहरही त्यास अपवाद नाही.

गोदावरी अर्थात गौतमी-गंगा ही भारतातील प्राचीनतम नद्यांपैकी एक असल्याने तिच्यावरदेखील अनेक कथा पुराणांमध्ये आल्या आहेत. याच गोदावरीच्या साक्षीने रचल्या गेलेल्या पुराणकथा आणि उत्खननात मिळालेले अवशेष यावरून आपल्याला पद्मनगरपासून नाशिकपर्यंतचा प्रवास उलगडता येतो. पौराणिक ‘युग’ संकल्पनेनुसार चार युगात नाशिकला विविध चार नावे असल्याचा श्लोक ब्रह्मपुराणात आला आहे. त्यानुसार कृतयुगात (सत्ययुग) ब्रह्मदेवाने येथे पद्मासनात तपश्चर्या केली म्हणून ‘पद्मनगर’, द्वापारयुगात गौतमांनी हे ठिकाण लोकांना राहण्यायोग्य केले म्हणून ‘जनस्थान’, त्रेतायुगात रामाने खर, दूषण आणि त्रिशर या तीन राक्षसांचा वध केला म्हणून ‘त्रिकंटक’ आणि लक्ष्मणाने शुर्पणखेचे नासिका छेदन केले म्हणून कलियुगात याला ‘नासिक्य’ अशी नावे या शहराला असल्याचे पुराणात उल्लेख आहे.

गोदावरी जेथून वाहत जाते तो प्रदेश ती ‘सुजलाम्-सुफलाम्’ करत पुढे वाहते. नदीवरून येणारे गार वारे आणि फुलांच्या बागा स्वर्गाचा आभास निर्माण करतात, त्यावरून मध्य युगात औरंगजेबाने या ठिकाणाला ‘गुलशनाबाद’ असे नाव दिले. महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर याला ‘नाशिक’ असे संबोधतात. ‘नवशिखरांवर वसलेले ते नाशिक’ अशी व्युत्पत्ती त्याची सांगितली जाते.

गोदेवर गंगापूर येथे धरणाचे बांधकाम चालू असताना काही दगडी हत्यारे मिळाली होती. त्यावरून या परिसरात साधारण इसविसनपूर्व दीड लाख ते साठ हजार वर्षांपूर्वी रानटी अवस्थेतल्या अश्मयुगीन मानवाचे अस्तित्व होते, असे संशोधकांचे मत आहे. जोर्वे संस्कृतीशी साधर्म्य असणारी संस्कृती नाशिकमध्येही नांदत होती. इसविसनपूर्व 2200 ते 800 या कालखंडातील अवशेष येथे आढळले आहेत. वैदिक नासिक-वेद म्हणजे श्रुतींवर आधारित असणारा ‘श्रौतधर्म’ प्राचीन काळापासून येथे होता. पुराणातील देव ‘नवविधाभक्ती’ने प्रसन्न होतात, अशी भाविकांची श्रद्धा. हीच श्रद्धा आज नाशिकच्या विकासाचा महत्त्वाचा स्रोत आहे.

बौद्ध संप्रदाय

इसविसनपूर्व पहिले शतक ते इसविसनाचे दुसरे शतक या काळात नाशिकमध्ये मूळ बौद्ध धर्माचा प्रभाव असल्याचे आढळते. बौद्धमत ही विशिष्ट आचारण पद्धती होती. दीक्षा घेतलेल्या भिक्खुने तीन रात्रीपेक्षा जास्त एका नगरात राहू नये, केवळ पावसाळ्याच्या दिवसात चार महिने तो एका ठिकाणी वास्तव्य करू शकतो, असा नियम होता. या वर्षावासासाठी डोंगरात लेण्या कोरल्या गेल्या. सर्वसाधारणपणे लेण्या या तत्कालीन व्यापारीमार्गाजवळ खोदलेल्या आढळतात.

जैन संप्रदाय

इसवीसन  चौदाव्या शतकातील जैन प्रभूसुरी यांनी लिहिलेल्या ‘विविधतीर्थकल्प’ या ग्रंथात नाशिकचा उल्लेख आला आहे. जैनांचे आठवे तीर्थंकर चंद्रप्रभ यांनी नाशिक येथे कुंतीविहार नावाचे मंदिर बांधले, असे त्यात म्हटले आहे. इसवीसनाच्या दहाव्या/अकराव्या शतकापासून जैन संप्रदायाचे भौतिक पुरावे नाशिकमध्ये उपलब्ध आहेत. सांप्रत नाशिकमध्ये जैनांचे श्वेतांबर, दिगंबर या मुख्य पंथांबरोबर स्थानकवासी, मंदिरमार्गी, तेरापंथी असे उपपंथदेखील आहेत. मूर्तीपूजा न मानणारे स्थानकवासी तर मूर्तीपूजा करणारे मंदिरमार्गी हे श्वेतांबरांचेच उपपंथ. तांबट गल्लीतील मंदिर हे प्राचीन तर विल्होळीचे अर्वाचीन मंदिर अशी मंदिरमार्गी जैनांची मुख्य दोन मंदिरे आणि स्थानकवासी जैनांची 15 स्थानके नाशिक शहरात आहेत. जैन रामायणानंतर नाशिकमध्ये रामकथा लोकप्रिय झाल्याचे विद्वानांचे मत आहे.

ऐतिहासिक नाशिक

ऐतिहासिकदृष्ट्या नाशिकचा सर्वात प्राचीन म्हणजे इसविसनापूर्वीचा उल्लेख जबलपूरजवळच्या भारहूत येथील स्तुपावर आहे. तसेच इसविसनपूर्व 150 मध्ये भारतात आलेल्या टोलेमी या इजिप्तशियन प्रवाशाच्या लिखाणात धर्मपीठ म्हणून नाशिकचा उल्लेख आला आहे. सातवाहन काळात येथे बौद्ध आणि वैदिक दोन्हींचा प्रभाव असल्याचे पांडवलेणीतील शिलालेखात आढळते. यादव काळात म्हणजे दहा ते बाराव्या शतकात येथे अनेक मंदिरे बांधली गेली. मुघल काळात नवनिर्मिती थांबली. त्यानंतर सतराव्या शतकात पेशवे आणि त्यांच्या सरदारांनी या तीर्थक्षेत्रास गतवैभव प्राप्त करून दिले. नाशिकमध्ये वाडे, गोदावरीवर घाट, कुंड बांधले, मंदिरांची पुनर्बांधणी केली. या काळात मंदिरांच्या बांधकामात विविधता आली परंतु वाड्यांच्या रचनेत फारसे बदल झाल्याचे आढळत नाही.

सह्याद्रीच्या कुशीतले नाशिक

सह्याद्री पर्वतरांगा, घनदाट झाडी, मुबलक पाऊस, गुलाबी थंडी आणि सुसह्य उन्हाळा असे आल्हाददायक वातावरण असलेल्या नाशिकमध्ये राहण्याचा मोह आवरता येणे तसे कठीणच. पुण्यप्राप्ती आणि रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडा विराम अशा दुहेरी उद्देशाने लोक येथे येत होते आणि येत असतात. गोपिकाबाई पेशवे वयाच्या उत्तरार्धात इथे येऊन राहिल्या. आनंदीबाई पेशवे आणि राघोबादादा आनंदवल्लीला आले. येताना अनेक कलाकारांचा फौजफाटा घेऊन आले. ब्रिटिशांनीदेखील अंजनेरीच्या टेकड्यांवर काचमहाल बांधले. यावरून ‘विकेंड होम’ ही संकल्पना नाशिकमध्ये बर्‍याच शतकांपूर्वीपासून रुळलेली दिसते. ब्रिटिशांचे काचमहाल आज शिल्लक नाहीत पण पेशवाईतील वाडे आणि मंदिरे तत्कालीन कलेची साक्ष देण्यासाठी आजही दिमाखात उभे आहेत. आजदेखील मुंबईकर ‘विकेंड होम’ म्हणून नाशिकलाच प्रथम पसंती देतात.

आधुनिक काळात नाशिकने मंत्रभूमीकडून यंत्रभूमीकडे वाटचाल करत करत वाईन कॅपिटल म्हणून जगात नावलौकिक मिळवला. मुंबई-नासिक-पुणे या महाराष्ट्राच्या सुवर्ण त्रिकोणाचा एक महत्त्वाचा कोन नाशिक असल्याने मुंबईपाठोपाठ उद्योगनगरी आणि पुण्यापाठोपाठ शैक्षणिक शहर म्हणून ख्याती मिळवली. आज कृषी व्यवसाय क्षेत्रातही नाशिक मागे नाही. येथे पिकणारे कांदे निर्यातीच्या दर्जाचे, कोकणात पिकणारे आंबे निर्यात करण्यापूर्वी प्रक्रियेसाठी येथे येतात. येथून दोन राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने दळणवळण सोयीचे झाले आहे.

येथील भाजीपाला रोज मुंबईला जातो म्हणून याला ‘मुंबईचे स्वयंपाकघर’ असेही म्हणतात. ब्रिटिशांनी येथे रेल्वेचे रूळ टाकण्याचा घाट घातला असताना अनेकांनी त्याला विरोध केला म्हणून शहराच्या दूरवरून रूळ टाकले गेले. पण जेव्हा रेल्वे सुरू झाली तेव्हा येथील भिक्षुक मंडळी खांद्यावर नामावळी टाकून यात्रास्थांना घेण्यासाठी रेल्वेस्थानकावर जात असत. आज त्यांचीच पुढची पिढी यात्रास्थांचे ऑनलाईन बुकिंग करून घेत आहेत आणि नामावळ्यांचा डाटा ‘लॅपटॉप’मध्ये सेव्ह करून ठेवत आहे.

समस्त भारतातील आणि परदेशी स्थायिक झालेली तरुणाई आपला सांस्कृतिक वारसा समजून घेण्यास उत्सुक आहे. पद्मनगरातील तपोवन, जनस्थानातील गौतमाचे भाताचे शेत, त्रिकंटकातील सीतागुंफा आणि नाशिकची नवशीख पाहण्यासाठी विविध संस्थांद्वारे ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन केले जाते. तरुण पिढीने तंत्रज्ञानाच्या आधारे आकाशाला गवसणी घातली तरी त्यांचे मन पुराणकाळात रमत आहे. सिंहस्थ पर्वणीसाठी सुलभ असे विविध ‘अ‍ॅप’ तयार करून 2015-16 च्या मेळ्यात हायटेक कुंभाची अनुभूती घडवली. दंडकरण्याचा भाग असलेल्या या पद्मनगरात घनदाट झाडी होती. ती मध्ययुगात विरळ होऊ लागली होती. आता परत नाशिकमध्ये नवीन जंगले निर्माण केली जात आहेत. गौतमांच्या काळापासून चालत आलेली भातशेती आजही येथे केली जाते. ‘कमोद’चा सुगंध आणि ‘कोळपी’चा दाणा घेऊन नवीन इंद्रायणी जात विकसित करून त्याचे पीक आता घेतले जाते.

पद्मनगर आणि नासिक यातील लोकजीवन, सामाजिकमुल्ये तर निश्चित बदलले परंतु पुराणकथा आजही तशाच आहेत. या कथांवर प्राचीन मानवाच्या ठिकाणी असलेल्या भाबड्या श्रद्धेची जागा आता धार्मिक अस्मितेने घेतली आहे. भौतिकवादीवृत्तीतून मानसिक शांतता लाभत नाही म्हणून ‘नाशिक’ या तीर्थक्षेत्री येणार्‍यांची संख्या पद्मनगरच्या तुलनेत कैकपटीने वाढली आहे. परंतु पद्मनगरात असलेले गोदेचे ‘पावित्र्य’ संपुष्टात आले आहे. पूर्वीची गोदा केवळ माहेरवाशीण म्हणून घरी यायची आणि सन्मानाने सौभाग्यलेणं घेऊन जायची. आज तिला तिच्या स्वतःच्या हक्काच्या जागेसाठी दाद मागावी लागत आहे. यातून सच्चा नाशिककर खरेच काही शिकला तर या भूमीवर पुढील हजारो वर्षे मानवी वस्ती सौख्याने नांदू शकते, नाहीतर ‘नाशिक संस्कृती’चे विलिनीकरण ‘हडप्पा संस्कृती’त झाल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!