पढेगावात दोन तरूणांचे मृतदेह आढळले

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव परिसरात दोन आदिवासी तरुण मजूर मृतावस्थेत आढळले. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील पढेगाव परिसरात काल सकाळी कोळसा काढण्यासाठी आलेले दोन तरुण मजूर रवींद्र सखाराम घोगरे, संतोष शिवा वाघमारे हे मृतावस्थेत आढळल्याने परिसरातील ग्रामस्थांनी त्यांना पढेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनीही त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. पथवे, हेड कॉन्स्टेबल बर्डे यांच्यासह काही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पहाणी करून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श्रीरामपूर येथे पाठविले. तरुणांचे नातेवाईक येण्यात उशीर झाल्याने शवविच्छेदनाला विलंब लागणार होता.
हे मजूर रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील गायचूल या गावातून पढेगाव परिसरात कोळसा काढण्याच्या कामासाठी आले होते. काल रात्री रवींद्र घोगरे व संतोष वाघमारे यांनी कोळशाची भट्टी लावली व त्याच ठिकाणी झोपले होते. कोळशाची भट्टी फुटल्याने त्यामधून निघणार्‍या धुरामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज परिसरातून व्यक्त केला जात होता. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*