Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव

घर कोसळून सव्वा महिन्याच्या बाळासह आजीचा मृत्यू

Share

प्रा.यशवंत पवार

नांद्रा, ता.पाचोरा । 

नांद्रा (नवेगाव) (ता.पाचोरा) येथे दि. 4 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास मातीचे घर कोसळल्याने त्याखाली दबून सव्वा महिन्याचे बाळ (मुलीचा मुलगा) व आजी यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर असे की, येथे अनेक दिवसांपासून कमी-अधीक प्रमाणात पाऊस सुरू असल्याने या पावसामुळे शेतीपिकांसह घरांचे मोठे नुकसान होत आहे. त्यातच दि.4 रोजी रात्रीच्या सुमारास सततच्या पावसामुळे पाणी मुरून मातीचे घर कोसळून त्याखाली आजीसह त्यांचा सव्वा महिन्याचा नातू (मुलीचा मुलगा) यांचा दु:खद अंत झाल्याची घटना घडली. यात आजी शोभाबाई नामदेव पाटील (वय 50) व नातू समर्थ संदीप पाटील (वय सव्वा महिना) रा.लोण यांचा मृत्यू झाला.

काही महिन्यांपूर्वी याच घरातील कर्ता पुरूष नामदेव पाटील यांचे हृदयविकाराने निधन झाले. यानंतर घराचा सांभाळ शोभाबाई नामदेव पाटील या करत होत्या. जे घर पडले त्या घरात ते भाड्याने राहत होते. त्यांना एक मुलगा व तीन मुली असून घर कोसळले तेव्हा शोभाबाईसह नुकतीच बाळंत झालेली मुलगी व एक शिक्षण घेत असलेली लहान मुलगी व मुलगा असे सदस्य झोपलेले होते.

घर कोसळण्याचा आवाज ऐकू येताच आजूबाजूच्या रहिवाशांनी धाव घेत त्याखाली दाबले गेलेल्या या कुटूंबाला काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र सव्वा महिन्याचे बाळ व आजी यांचा मृत्यू झाला तर एक मुलगा व दोन मुली जखमी झाले आहेत.

बाळ गेल्याने आईचे भान हरपले

प्रियंका संदीप पाटील ही मुलगी बाळंतपणासाठी माहेरी आली होती. तीने सव्वा महिन्यापूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला त्याचे नावही त्याला शोभेल असे ‘समर्थ’ ठेवले मुलगा झाल्याचा आनंद माहेरासह तीच्या सासरी सुध्दा गगनात मावेनासा झाला होता. काही दिवसांपूर्वी प्रियंकाच्या वडीलांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

ते दु:ख कसेबसे विसरत आईची माया व खंबीर साथ शोभाबाई यांनी दिली. त्यांच्या मायेच्या पंखाखाली शोभाबाई यांचा मुलगा व मुलगी आनंदात राहु लागले. मुलीचे बांळंतपण आईच्या घरी व्हावे म्हणून लोणी येथील मुलगी प्रियंका हिला माहेरी आणले व तीला मुलगा (समर्थ) झाला. मात्र सव्वा महिना होत नाही तोच नियतीने घाला घातला व कोमळ सव्वा महिन्याच्या या बाळाचा मातेच्या कुशीतच मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी व हृदय हेलावून टाकणारी असल्याने या मातेने (प्रियंकाने) बाळ गेल्याचे बघून तीचे भानच हरपले.

मातृ-पितृ छत्र हरपलेल्या मुलांना दिला मदतीचा हात

वडीलांचा हृदयविकाराने आणि आईचा घराच्या छताखाली दबून मृत्यू झाल्याने मातृ-पितृ छत्र हरपलेल्या नामदेव पाटील व शोभाबाई पाटील यांच्या दोन मुलींचे लग्न झाले आहे. मात्र मुलगा हेमंत व मुलगी मानसी हे शिक्षण घेत असून ही बहिन भावंड आता पोरकी झाली आहेत.

त्यांना कमाईचे कोणतेच साधन अथवा घरात मोठी व्यक्ती नाही. वडील मोलमजूरी करण्यासाठी नांद्रा येथे गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून येथे आले होते. त्यांचे दु:ख कमी करण्यासाठी व आपणही समाजाचं देणं लागतो या हेतूने ग्रामस्थांनी सढळ हाताने मदत करून 50 हजार रूपये जमा करून या मुलांना मदतीचा हात दिला. शासनानेही या दुर्दैवी घटनेची दखल घेवून आर्थिक मदत करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!