Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedPhoto : बंदी असताना भरला बाजार; नगरकरांची खरेदीसाठी गर्दी

Photo : बंदी असताना भरला बाजार; नगरकरांची खरेदीसाठी गर्दी

अहमदनगर (प्रतिनिधी) –

जिल्ह्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संसर्ग साथसाखळी तोडण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन दिवसांपूर्वी ‘जनता कर्फ्यू’ चे आवाहन केले होते.

- Advertisement -

यानंतर जिल्हा प्रशासनाने नवीन अध्यादेश काढत अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 यावेळेत सुरू ठेवण्याचे आदेश दिले. रविवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी रस्त्यावर उतरून संचारबंदीच्या कडक अंमलबजावणीचा आढावा घेतला. मात्र सोमवार उजाडताच नगरकरांनी मार्केट यार्ड, सावेडी परिसरातील पाईपलाईन रोड, एकविरा चौक, चितळे रोड परिसरात भाजीपाला खरेदीसाठी गर्दी केली.

जिल्ह्यात करोना संसर्ग वाढत असून दररोज तीन हजारांच्या पुढे करोना रुग्ण समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात करोना परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात बेड, रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा तुटवडा असल्याची बाब मंत्री महोदयांच्या लक्षात आली. यामुळेच त्यांनी करोना संसर्ग रोखण्यासाठी ‘जनता कर्फ्यू’ चे आवाहन केले. जिल्हा प्रशासनाने आदेश जारी करत सोमवारपासून सकाळी 7 ते 11 अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या. दोन दिवसांपूर्वी मनपाने आदेश काढून शहरातील भाजीपाला बाजार बंद केलेले असतानाही एकविरा चौक, पाईपलाईन रोड, चितळे रोड व मार्केड यार्ड परिसरात भाजी विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली. विक्रीला आलेला भाजीपाला पाहून नगरकरांनीही भाजी खरेदीसाठी गर्दी केली.

एकीकडे प्रशासन नागरिकांना घरात राहण्याचे वारंवार आवाहन करत आहे. तर दुसरीकडे नागरिकांकडून नियमांचे वारंवार उल्लंघन होतानाचे चित्र नगरमध्ये दिसत आहे. सोमवारी केलेल्या गर्दीमुळे लोकांना करोना महामारीची भीती आहे की, नाही हाच प्रश्न उभा राहिला आहे.

पोलिसांनी केली वाहने जप्त

संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. विनाकारण घराबाहेर पडणार्‍यांची वाहने जप्त करून त्याला पोलीस ठाण्यात आणले जाईल, त्याठिकाणी त्याला समुपदेशन करून दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिला होता. शहर पोलिसांनी सोमवारी सकाळपासून त्याची अंमलबाजवणी करण्यास सुरूवात केली. चौकाचौकांत नाकाबंदी करून विनाकारण फिरणार्‍यांची पोलिसांनी वाहने जप्त केली. ही वाहने सायंकाळी 500 रुपये दंड भरून सोडून देण्यात आली. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

आता फक्त घरोघरीच भाजी विक्री

काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील 14 भाजीपाला बाजार बंद केले होते. फक्त काही चौकात व घरोघरी भाजी विक्री करण्यास परवानगी दिली होती. परंतु, भाजी विक्रीच्या ठिकाणी होत असलेली गर्दी पाहता आता फक्त सकाळी 7 ते 11 यावेळेत शहरात घरोघरी भाजी विक्री करण्याबाबतचा नवीन आदेश आयुक्त गोरे यांनी सोमवारी काढला.

- Advertisment -

ताज्या बातम्या