Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

अधिवास नसल्याने कीटक खाणारे पक्षी घटले; पिकांवर प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत

Share

कवडदरा | वार्ताहर

इगतपुरी तालुक्यातील कवडदरा परीसरात दिवसेंदिवस वृक्षाची संख्या कमी झाल्यामुळे पक्ष्यांचे वास्तव्य धोक्यात आले आहे. परिणामी  किडींना खाणाऱ्या पक्षांचा अधिवास याठिकाणी नसल्याने पिकावर किडीचे प्रमाण वाढले आहे असल्याचे शेतकरी सांगू लागले आहेत.  निसर्गातील किडे, मुंग्या खाऊन आपले अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येमध्ये मागील दशकापासून लक्षणीय घट झाली असल्याने पिकांवरील किडीचे प्रमाण वाढले आहे.

निसर्गाच्या हिरवळीमध्ये, अंगणांतील झाडाझुडपांवर पहाटेच्या वेळी  अनेक पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यासारखा आणि पाहण्यासारखा असायचा. परंतु, सध्या हे चित्र दुर्मिळ झाले असून, पक्ष्यांचे थवेच्याथवे दिसणारे आकाश पांढरेशुभ्र दिसते आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे पक्ष्यांचे अस्तित्व धोक्‍यात येत असून, ते मानवासाठी धोकादायक ठरत आहे.

निसर्गातील किडे, मुंग्या खाऊन आपले अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येमध्ये मागील दशकापासून लक्षणीय घट झाली असल्याने पिकांवरील किडीचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे. जमिनीची नांगरणी करताना पूर्वी पाच-पन्नास पांढरे बगळे नांगराच्या पाठीमागे फिरताना दिसायचे.

जमिनीची उलथापालथ होताच आतून अळ्या, किडे बाहेर निघताक्षणी त्यास बगळे फस्त करत असत. तसेच पिकांवरील अनेक किडे, अळ्यांनाही अचूक ‘टायमिंग” साधून टिपत असत.

पक्ष्यांच्या संख्येत घट झाल्याने आज लष्करी अळी आणि जमिनीखालील हुमणी शेतकऱ्यांसाठी पक्ष्यांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होऊन बसली आहे. गहू, उडीद, पालेभाजा, मका, तूर, मूग आदी पिकांवर रोगांचा व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो. हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकांवर कीटकनाशकांच्या फवारण्या केल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी ते विष मानवाच्या पोटात कालवले जात आहे.

सिमेंटची वाढती जंगले, महामार्गाच्या निर्मितीसाठी, कारखाने उभारणी, उद्योग- व्यवसाय, निर्मितीसाठी उभ्या वृक्षांवर कोसळत असलेल्या कुऱ्हाडीमुळे झाडांवर बसणाऱ्या पक्ष्यांची घरटी उद्धवस्त झाली आहेत. त्यातच असंख्य पक्षी गतप्राण झाले. तर काही पक्ष्यांनी आपला मोर्चा जंगलाकडे वळवला.

त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात सर्रास आढळणारे पक्षी आता दिसेनासे झाले आहेत. कवडदरा, साकूर, घोटी खुर्द, धामणगाव परीसरात पक्ष्यांचे प्रमाण कमी झाल्याने हरभरा, मका, गहू पिकावर किडीचे प्रमाण वाढले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!