पाहुण्या : ‘जीवित नदी फाउंडेशन’च्या संस्थापक शैलजा देशपांडे

विषय : उत्सव आणि नदीचे पावित्र्य

संचलन : एन. व्ही. निकाळे

नाशिक । Nashik विशेष प्रतिनिधी

आपला अख्खा देशच उत्सवप्रिय आहे. त्यामुळे नद्यांवर प्रचंड दुष्परिणाम होतात. नदीवर आपण किती वेळा जातो? केवळ नदीसाठी नदीवर किती वेळा जातो? स्वत:साठी नदीवर किती वेळा जातो? जातो ते मूर्ती विसर्जन, निर्माल्य टाकायला अथवा धार्मिक विधी करायला जातो.

म्हणजे आपण केवळ नदीवर परिणाम करायला जातो. नदीसाठी मात्र काही करायला जात नाही, असे निरीक्षण पुण्यातील ‘जीवित नदी फाउंडेशन’च्या संस्थापक आणि संचालक शैलजा देशपांडे यांनी नोंदवले.

दैनिक ‘देशदूत’च्या ‘आमच्या गप्पा’ कार्यक्रमात ‘उत्सव आणि नदीचे पावित्र्य’ या विषयावर शैलजा देशपांडे यांनी अभ्यासपूर्ण विचार मांडले. मानवी जीवनात नदीचे स्थान कायम आहे.

त्यात काहीच फरक पडलेला नाही. नद्यांनी मानवी जीवनात समृद्धी आणली आहे, पण आपल्याला नदी कळलेलीच नाही. पूर्वी माणूस नदीवर किंवा पाणवठ्यावर विविध दैनंदिन गरजांसाठी जात असे.

आज नदीचे पाणी आपल्याला नळातून घरपोच येते. धरणातील पाणी कमी झाले वा धरण कोरडे झाल्यावर नळाला पाणी येत नाही. तेव्हा ओरड केली जाते, पण नदीच्या उगमावर आणि तिच्या खोर्यावर काहीतरी परिणाम झाला आहे, याची जाणीव किती जणांना होते? असा सवालही देशपांडे यांनी उपस्थित केला.

नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर काही स्वयंसेवी संस्था हिरिरीने सहभाग घेत आहेत. प्रबोधन करीत आहेत, पण ते प्रबोधन लोकांना रुचत नाहीत.

नदीला कशामुळे त्रास होतो? मी कोणत्या गोष्टी केल्या तर नदीला फायदा होईल? याची जाणीव प्रत्येक माणसाला होत नाही, प्रबोधन आचरणात येत नाही तोपर्यंत नदीत सुधारणा होईल, असे वाटत नाही, असेही देशपांडे यांनी सांगितले.