राशीनची यमाई देवी

राशीनची यमाई देवी

अहमदनगर जिल्ह्यातील देवीमातेची प्रसिद्ध ठिकाणे या विशेष मालिकेत आपल्याला ओळख करून देणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेेल्या राशीन येथील यमाई देवीची ..

राशीन हे गांव अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नगर, सोलापुर आणि पुणे या तिन्ही जिल्ह्याच्या सीमेनजिक असे आहे. साधारणपणे दिड हजार वर्षापुर्वी हे क्षेत्र वसलेले असावे; परंतु इ.स.700 पासुन पुढचीच माहीती इतिहासात मिळाली आहे.

दक्षिणे भारताच्या धार्मिक, राजकीय व सामाजिक इतिहासात राशीन या तीर्थक्षेत्राला फार मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. जगदंबेचे स्वयंभु स्थान असलेल्या या तीर्थ क्षेत्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहासही बोलका आहे. अष्टभुजा देवीने महिषासुराशी नऊ दिवस लढाई करून त्याचा वध केला. या घटनेचा राशीनच्या स्वयंभु देवतांशी संबंध जोडला जातो. श्री क्षेत्र राशीन हे श्री यमाई देवीचे स्वयंभु स्थान आहे असे मानले जाते. या देवीला कुणी रेणुका देवी म्ह्णण्तात. तर कोणी येमाई देवी म्हणतात. जेव्हा सीतामाईचे रावणाने अपहरण केले होते . तेव्हा सीतेच्या आठवनीचे प्रभु श्रीरामचंद्र वेडेपीसे झाले होते. त्यावेळी रामाची गंमत करण्यासाठी पार्वतीमातेने सीतेचे रूप धारण केले पार्वती सीतामाईच्या रूपात रामापुढे उभी राहीली, त्यावेळी प्रभु रामचंद्राने त्यांना ये माई अशी हाक मारली. त्यामुळे राशीनच्या देवीला येमाई असे म्हणतात. अशी एक अख्यायिका ऐकायला मिळते. देवीची मुर्ती चतुर्भुज असुन स्वयंभु उभी आहे. मिळालेल्या माहीतीनुंसार देवीचे स्थान 1300 वषापुर्वीचे आहे. असे मानले जाते.

देवीचे मंदिर गावाच्या दक्षिणेला असून प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. मूळ मंदिराच्या चारही बाजूंनी ओवर्‍या आहेत. समोर दोन भव्य दीपमाळा आहेत. त्यापैकी उजव्या हाताकडील दीपमाळ हलणारी आहे हे येथील खास आहे.

देवीचे मंदिर पुरातन असून ओवर्‍या आणि प्रवेशद्वार 200 ते 250 वर्षापूर्वी बांधले आहेत. मंदिराच्या आवारातून प्रदक्षिणेचा पूर्ण दगडी मार्ग आहे. रंगीबेरंगी रंगात रंगलेलं मंदिर विलोभनीय दिसतं. देवीची मूर्ती यमाई देवीची चतुर्भूज स्वयंभू मूर्ती असून हे माहुरच्या रेणुकामातेचे स्थान आहे. देवीच्या उजव्या बाजूला तुकाई हे तुळाजापुरचे स्थान आहे. मध्ये चतुश्रृंगी देवीची पंचधातुची चलमूर्ती आहे. जगदंबा मंदिरात त्या वेळच्या शेंदुर्गी लाकडाच्या कमानी अद्यापही तशाच आहेत. जगदंबा देवीचा उत्सव आश्विन शु. प्रतिपदा ते आश्विन पौर्णिमेपर्यंत असतो. नवव्या -दहाव्या शतकातील हे मूलस्थान. साधारण सतराव्या शतकाच्या सुमारास उभारलेल आताच हे यमाई-तुकाईचं देवीचं मंदिर. या देवीचा उल्लेख रेणुका, जगदंबा, भवानी असा केलेला देखील आढळतो. मंदिराचे प्रवेशद्वार अत्यंत आकर्षक आणि गगनला भिडणारे असे आहे. आत प्रवेश केल्यावर भला मोठा सभामंडप ! सभामंडपात मंडपाकृती चौथर्‍यावर स्थानापन्न सिंहप्रतिमा!

मंदिरद्वारातून प्रवेश केल्यावर उजवीकडे एक भला मोठा नगारखाना आहे. मंदिराच्या प्रांगणात आहेत सुरेख, सुबक, भव्यदिव्य, गगनचुंबी, विविध रंगात नक्षीकाम असलेल्या डोलणार्‍या दीपमाळा. दक्षिण बाजूच्या दीपमाळेवर जाण्यासाठी बाहेरून पायर्‍या आहेत. उजवीकडील दीपमाळेस आतून जिन्याप्रमाणे पायर्‍या आहेत. बांधकाम खाली दगड आणि वर विटांचे आहे. जिन्याने वर गेले की अगदी वर एक आडवा लाकडी दांडा आहे. तो धरून हलवला की दीपमाळ हलते. ही आश्चर्यजनक रचना इथे बघायला मिळते. एरवी बंद असलेले जिने फक्त दसर्‍याच्या दिवशी खुले होतात.

मंदिराच्या आवारात गणपतीची शेंदूर अर्चित, दुर्वाफुलांच्या हाराने नटलेली प्रतिमा एकटक पाहत रहावे अशी. मंदिराच्या गाभार्‍यात उजवीकडील राशीनची यमाई आणि डावीकडील तुळजापूरची तुकाई अशा दोन सुरेख-सुबक मूर्ती आहेत. मंदिराचा कळस विविध रंगात देवदेवतांनी फुललेला आहे. मंदिराच्या बाहेरील सभामंडपात वीरगळ, सतीशिळा आहेत. जगज्जननी असणारी श्रीजगदंबा आपल्या भक्तांच्या कल्याणाकरता सर्वतोपरी तयार आहे. तिची अनेक मंदिरे आपल्याला निरनिराळ्या ठिकाणी पाहायला मिळतात.

तर उद्या भेटू या अहमदनगरच्या कोल्हार भगवतीपूर येथे साडेतीन शक्तीपीठाचे एकत्रित वस्तीस्थान असलेल्या श्री. भगवती देवीच्या माहितीसह...

Related Stories

No stories found.