साडेतीन शक्तीपिठांचे एकत्रित वस्तीस्थान : कोल्हार भगवतीपूर

साडेतीन शक्तीपिठांचे एकत्रित वस्तीस्थान : कोल्हार भगवतीपूर

देशदूत-सार्वमत समूहाच्या अहमदनगर जिल्ह्यातील देवीमातेची प्रसिद्ध ठिकाणे या विशेष मालिकेत आपले स्वागत. मी वर्षा भानप आपल्याला ओळख करून देणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार भगवतीपूर येथील साडेतीन शक्तीपिठांचे एकत्रित वस्तीस्थान असलेल्या भगवतीदेवी मंदीराची...

कोल्हार भगवतीपूरची भगवतीमाता, तुळजापूरची तुळजाभवानीमाता, माहूरची रेणुकामाता, वणीची सप्तशृंगीमाता यांचा अलौकिक संगम असलेल्या या पवित्र शक्तिपीठांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्री भगवतीमाता नवसाला पावते अशी तिची ख्याती आहे. यावर्षी नवरोत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मंदिरास आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे तसेच आवश्यक तेथे दुरुस्ती, नुतनीकरण केले आहे.

याठिकाणी घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत रूढी-परंपरेनुसार व भक्तिभावाने चालणार्‍या नवरात्र महोत्सवाचा प्रारंभ सकाळी 8 वाजता ग्रामस्थांच्या वतीने अभिषेकाने होतो. त्यानंतर सिंदूरलेपीन, अलंकरण, घटस्थापना व महाआरती होते. देवी मूर्तींच्यामागील चांदीची रेखीव मखर व फुलांनी केलेले सुशोभीकरण मनमोहक दिसते. दरवर्षी येथे देवीमहात्म्य पारायण, दुर्गा सप्तशतीपाठ तसेच भजनी - कीर्तन आदी कार्यक्रम होत असतात. याकाळात नऊ दिवस उपवास करणारे, घटी बसणारे महिला - पुरुष भाविक मंदिरातच वास्तव्य करतात. दरवर्षी नवरात्रोत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सकाळच्या सुमारास येथे वेगवेगळे कीर्तनकार तथा प्रबोधनकारांची कीर्तने व व्याख्याने आयोजित केली जातात मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बरेच बदल यावर्षी दिसून येतील. अष्टमीस नवचंडी यज्ञास प्रारंभ होतो तर नवमीस पूर्णाहुती दिली जाते. मंदिरात तसेच सभोवताली व प्रमुख रस्त्यांवर केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे परिसर झगमगटून जातो.

पूर्वाभिमुख असलेले येथील भगवतीमातेचे मंदिर हेमांडपंथी बांधकामाचे आहे. मंदिर पुरातन काळात उभारले गेले असूनी जिर्णोद्धाराच्यावेळी जमिनीमध्ये सुमारे 50 ते 60 फुट खोलवर खोदकाम करूनही मंदिराचा पाया सापडला नव्हता. तथा शिलालेखसदृश्य अन्य पुरावा मिळाला नाही. त्यामुळे मंदिराच्या स्थापनेचा निश्चित काल सांगता येत नाही. संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सरदारांच्या जहागिरीतील कोल्हार - भगवतीपुर हे गाव होते. आळंदी येथील एका ग्रंथात ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासा ते आळंदी प्रवासात या मंदिरात मुक्काम केल्याचा उल्लेख आहे. येथील जुन्या कोल्हाळेश्वर महादेव मंदिरातील मोठ्या नंदीच्या पाठीमागील बाजूकडून ते थेट श्री भगवतीमंदिराच्या पाठीमागेपर्यंत पूर्वीच्या काळी जमिनीखालून भुयार असल्याचे सांगितले जाते. ते भुयार आता सापडत नाही. या व्यतिरिक्त अनेक आख्यायिका व मंदिर स्थापनेविषयी अनुमान सांगितले जातात. श्री भगवतीदेवीचे मंदिर शेकडो वर्षांपूर्वी उभारले गेले असावे असा कयास आहे.

कोल्हार भगवतीपुर देवालय ट्रस्टच्या माध्यमातून देवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरातील पुरातन मूर्तींच्या जागी नूतन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा भव्य सोहळ्याने झाली. याशिवाय ट्रस्टअंतर्गत विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व मारुती मंदिराचे जीर्णोद्धार कार्य पूर्ण झाले. देवीच्या मंदिरातील भव्य सभामंडप, ग्रॅनाईट फरशीचे काम, दीपमाळेपुढील आकर्षक व भव्य व्यासपीठ, मंदिराच्या सभामंडपाच्या कमानी, मंदिरातील आकर्षक व रेखीव नक्षीकाम, भक्तनिवास, रंगरंगोटी या सर्व गोष्टींमुळे मंदिराच्या सौंदर्यात भरच पडली आहे. देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश आहे. त्याअंतर्गत प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या काही निधीतून ट्रस्टद्वारा गावात महत्त्वाच्या ठिकाणी बसविलेल्या हायमॅक्स पथदिव्यांच्या झगमगाटाने गाव उजळून निघाले. याशिवाय मंदिराच्या प्रांगणात वाहनतळ उभारण्यात आलेले आहे. मंदिराच्या भव्य प्रांगणात बसविलेल्या पेव्हिंग ब्लॉक व वृक्षारोपणामुळे मंदिर परिसर प्रसन्न आणि सुशोभित झाला आहे.

तर श्रोत्यांनो उद्या भेटू या अहमदनगरच्या श्रीरामपूरची ग्रामदेवता वढणे वस्ती येथील महाकालिका देवी आणि काळूआई मातेच्या माहितीसह...

Related Stories

No stories found.