Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedश्रीरामपूरची ग्रामदेवता महाकालिका देवी आणि काळूआई

श्रीरामपूरची ग्रामदेवता महाकालिका देवी आणि काळूआई

अहमदनगर जिल्ह्यातील देवीमातेचे प्रसिद्ध ठिकाणे या विशेष मालिकेत आपल्याला ओळख करून देणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरची ग्रामदेवता महाकालिका देवी आणि काळूआई या महाशक्तींची…

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 7 मधील वढणे वस्ती येथील सुमारे 70 वर्षांपूर्वी कात टाकून नव्या रुपात पदार्पण केलेले महाकालिका देवी आणि काळूआई (मांढरा देवी) मंदिर म्हणजे श्रीरामपूरच्या वैभवातील एक मानाचे पान आहे. नवरात्रीच्या दिवसांत शहरातील सर्व रस्ते महाकालिका देवीच्या मंदिराकडेच जातात. नवरात्राच्या दहा दिवस येथे श्रद्धा व भक्तीभावाने धार्मिक कार्यक्रम साजरे होतात. श्रध्दा व शासकीय नियम यांचा मेळ घालून नवरात्रौत्सव पार पाडला जातो.

- Advertisement -

स्वर्गीय राजाराम वढणे आणि स्वर्गीय सुंदराबाई वढणे यांनी वढणे वस्ती येथे 70 वर्षांपूर्वी छोटेसे मंदिर बांधले नि महाकालिका देवी आणि काळूआई (मांढरा देवी) मूर्तींची प्रतिष्ठापना केली. त्यांच्या पश्चात स्व. भगवंतराव वढणे आणी स्व. सुभद्राबाई वढणे देवी पुजा-अर्चा आणि मंदिराची व्यवस्था पाहू लागले. देवीचे दर्शन घेतल्याने आणि नवस बोलल्याने भाग्य उजळते, त्याची अडलेली कामे मार्गी लागतात आणि त्याचे आयुष्याच स्थिर होते, अशी भक्तांची धारणा आहे. त्यामुळे मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमेच्या दिवशी या मंदिरात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते.

जवळपासचे भाविकही दररोज दर्शनासाठी येत असतात. पुढे नवरात्रौत्सवात तर यात्रेचे स्वरूप प्राप्त होऊ लागले. मंदिर छोटेसे असल्याने आणि सभा मंडपही पत्र्याचा व लहान असल्यामुळे यात्रेच्यावेळी भाविकांना दर्शन घेताना अत्यंत अडचण होवून लागली. त्यामुळे भगवंतराव वढणे आणि सुभद्राबाई वढणे तसेच त्यांची मुले प्रताप, बद्रीनारायण यांनी मंदिराचा जिर्णोध्दार करण्याचा निर्णय घेतला. वढणे कुटुंब आणि भाविकांच्या मदतीने श्रीकालिका देवी आणि मांढरा देवीचे मंदिर दिमाखात उभे राहिले. नवरात्रात आणि वर्षभर मंदिर परिसरावर कॅमेरेद्वारे नियंत्रण ठेवले जाते. भक्तांवर कृपेचा वर्षाव करणार्‍या प्रसन्न देवीमूर्तींचे दर्शन होताच भाविकांचे मनही क्षणार्धात प्रसन्न होते.

नवरात्रोत्सवात श्रीकालिकादेवी आणि मांढरा देवीची रोज पहाटे पुजा केली जाते. साडी नेसवली जाते व संपूर्ण साजशृंगार केला जातो. रोज पहाटे 6 वाजता व रात्री 8 वाजता देवीची आरती केली जाते. या काळात दररोज मान्यवरांच्या हस्ते महापूजा व आरती करण्यात येते. श्रीकालिकामाता आणि मांढरा देवी हे श्रीरामपूरकरांचे ग्रामदैवत असल्याने स्थानिक भाविकांबरोबरच परिसरातील भाविकांची देखील अपार श्रद्धा या देवीवर आहे. त्यामुळे आरतीला महिला भाविकांची प्रचंड गर्दी असते.

विशेष म्हणजे सर्व जाती-धर्माचे लोक कोणताही भेदभाव न करता या नवरात्रौस्तवात अतिशय उत्साहाने सहभागी होतात. खर्‍या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेचा पाठ याठिकाणी श्रीरामपूरकर गिरवताना दिसतात. विशेष म्हणजे कोणतीही वर्गणी गोळा न करता वढणे कुंटुंब आणि दानपेटीतील दानाच्या मदतीने व्यवस्थापन खर्च भागविला जातो. नगरपालिका आणि पोलिस आणि कालिका देवी मित्र मंडळाचे सहकार्य असते. नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांत देवीच्या यात्रेमुळे मोठी उलाढाल होते. हातावर पोट भरणार्‍या फुगे, पिपाण्या विकणारे, रांगोळी, हार, नारळ, पानफुले तसेच मातीची भांडी विकणार्‍या लहान दुकानदारांपर्यंत प्रत्येकाला आपापल्या प्रयत्नानुसार अर्थलाभ होतो.

तर उद्या भेटू या अहमदनगरच्या राहुरी माहेर असलेल्या तुळजाभवानी मातेची माहितीसह …

- Advertisment -

ताज्या बातम्या