राहुरीची तुळजाभवानी माता

राहुरीची तुळजाभवानी माता

अहमदनगर जिल्ह्यातील देवीमातेचे प्रसिद्ध ठिकाणे या विशेष मालिकेत आपल्याला ओळख करून देणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीची माहेरवाशिण असलेल्या तुळजाभवानी मातेची...

राहुरी तालुक्यात जंगम गल्लीमध्ये तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे. नयनरम्य परिसरात वसलेल्या मंदिरात देवीच्या दर्शनानंतर जी मानसिक शांतता लाभते ती अद्भूत आहे. नवसाला पावणारी भक्त संकटात असतांना धावून जाणारी अशी या देवीची महती आहे. राहुरी तालुका हे तुळजाभवानी देवीचे माहेर आहे अशी मान्यता आहे.

राहुरी येथे तयार होणारी तुळजा भवानी मातेच्या पालखीला विजया दशमीला तुळजापुर येथे मोठा मान असतो. विजया दशमीला सदर पालखीचे होमात विसर्जन झाल्यानंतर त्या पालखीचा दांडा परत बुर्‍हाणनगर येथे येतो. नवरात्रोत्सवासाठी जेव्हा नव्याने पालखी तयार करायची असते शहरातील विविध समाजाला मान असतो,मग त्यात माळी सुतार लोहार तेली तांबोळी तसेच शेटे घराला मान आहे. पालखीचा दांडा बुर्‍हाणनगर येथील भगत श्रावणीअमावस्ये नंतर राहुरी येथे आणून देतात. ही पालखी दरवर्षी तयार करण्याचा मान राहुरी येथील विविध घराला असून यावर्षी पालखी तयार करण्याचा मान सुतार (कै उमाकांत पवार) अशोक उमाकांत पवार अरुण उमाकांत पवार सुनील उमाकांत पवार ह्यांचे घरास आहे.

त्यासाठी लागणारे लाकडे माळी समाजाचे मेहेत्रे घराकडे आहे. तसेच पटेल बंधूही लाकडे देतात. त्या लाकडाला आकार देण्याचे काम भांड परिवार करतात. पालखी अधांतरी ठेवण्यासाठी लागणारे लाकडे मुस्लिम समाजाच्या कादर बादशहा ताशेवाले ह्यांच्या घराकडे आहे. तर पालखी तयार केल्यावर तिला खिळापट्टी करण्याचा मान लोहार कुटुंबाकडे असतो तो मान रणसिंग परिवाराकडे ह्यावर्षी होता. पालखी तयार होत असतांना देखरेखीचे काम बुर्‍हान नगर येथील भगत कुटुंबाकडे आहे.

मानाची पालखी तयार होऊन तिची सजावट करून पालखी पारंपारिक पद्धतीने आरती पूजा करून जंगम गल्ली येथील तुळजा भवानी मंदिरात वाजत गाजत भाविकांना दर्शनासाठी ठेवली जाते. तुळजाभवानी मातेचे मंदिर हे सरदार घोगरे ह्यांची जागा असून त्या देवीच्या मंदिरात बसण्याचा मान येथील तिळवण तेली समाजातील मानकर्‍यांचा आहे. पालखीची आरती करण्याचा मान तनपुरे घराण्याकडे आहे. ही तयार झालेली पालखी तुळजापुरकडे नेण्याचा मान बुर्‍हाण नगर येथील भगत मंडळीकडे आहे. भगत ह्यांना पहिला फेटा बांधण्याचा मान शेटे परिवाराकडे आहे. पालखीचा नैवेद्य सुरेश धोत्रे यांच्या घरास आहे.

पहिली पान सुपारी देण्याचा मान तांबोळी कुटुंबाकडे आहे. पालखी गावात मिरविण्याची अनेक वर्षाची परंपरा आहे. पालखी ज्या ज्या हमरस्त्यांवरून जाते त्या रस्त्यावर सुवासिन सडा टाकतात, विविध रंगी रांगोळ्यांनी रस्ते सजवले जातात. प्रत्येक घरासमोर ही पालखी थांबते तेव्हा घरातील महिला मुली या पालखीचे औक्षण करतात. हा पालखी सोहळा खूपच रंगतदार ठरतो. मिरवणुकीनंतर पालखीच्या विविध मानकर्‍यांचा राहुरी नगरपालिकेच्या वतीने सत्कार केला जातो. तसेच पालखीची विधिवत पुजन करून खणा नारळाने तसेच साडी चोळी देऊन बोळवण केली जाते.

या मंदिरंशिवाय राहुरी येथे म. फुले कृषी विद्यापीठ आहे. 19 मार्च 1968 रोजी स्थापन झाले. महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत कृषी संबंधित वेगवेगळे संशोधन केले जातात. शेती व आधुनिक शेतीला उपयुक्त संशोधन सातत्याने या विद्यापीठामार्फत केले जाते, शेतीशी संबंधित अग्रगण्य असे हे विद्यापीठ आहे

तर उद्या भेटू या अहमदनगरच्या सुप्रसिद्ध रांजणखळगे असणार्‍या निघोज येथील श्री. मळगंगा मातेच्या माहितीसह

Related Stories

No stories found.