देशदूत ‘आमच्या गप्पा’

पाहुणे : कर्नल श्री खासगीवाले

विषय : चीनची मुजोरी आणि सीमेवरील तणाव

संवाद : एन. व्ही. निकाळे

नाशिक । विशेष प्रतिनिधी

चीन भारताला युद्ध करायला भाग पाडणार नाही. युद्धाच्या भानगडीत चीन पडणार नाही. कारण त्यामुळे चीनचीच नामुष्की होईल याची त्यांना कल्पना आहे. चीन आणि पाकिस्तान सतत भारताची बदनामी करीत सगळीकडे हिंडत असतात. पाकिस्तानलासुद्धा काश्मीरचा मुद्दा 35-40 वर्षे उगाळून काहीही फायदा झालेला नाही.

ओआयसीने त्याबाबत दखल द्यायला कानावर हात ठेवले आहेत. इस्मालिक देशांमध्ये पाकिस्तान तर आंतरराष्ट्रीय समुदायात चीन एकटा पडला आहे. साहजिकच एकटे पडलेले हे देश एकमेकांना सोबत करणारच. दुसरे त्यांच्यासोबत कोणीच नाही, असे परखड मतप्रदर्शन कर्नल श्री खासगीवाले यांनी केले.

दैनिक ‘देशदूत’च्या ‘आमच्या गप्पा’ कार्यक्रमात कर्नल खासगीवाले सहभागी झाले. ‘चीनची मुजोरी आणि सीमेवरील तणाव’ या विषयावरील चर्चेत त्यांनी भारत-चीनमधील ताज्या सीमावादाबाबत अभ्यासपूर्ण आणि रोखठोक विचार मांडले.

अलीकडच्या काळात चीन आक्रमक होऊन भारतीय सीमेवर अतिक्रमणाचा प्रयत्न का करीत आहे?

याबद्दल विश्लेषण करताना कर्नल खासगीवाले यांनी त्यामागील ग्यानबाची मेख सांगितली. चीन आक्रमक होण्याला तेथील देशांतर्गत राजनैतिक परिस्थिती कारणीभूत आहे. चीनच्या अध्यक्षांना त्यांच्याच पक्षातून आता थोडाफार विरोध होऊ लागला आहे. तो विरोध हाँगकाँगचे आणि तैवानमधील प्रकरणातून उद्भवला आहे.

अशावेळी लोकांचे आणि राजकीय पक्षांचे मन वळवण्यासाठी त्यांना काहीतरी प्रश्न निर्माण करायचा होता. आपले वर्चस्व दाखवून राजकीय वजन स्थिर होण्यासाठी भारत-चीन सरहद्दीचा प्रश्न सर्वात सोपा आहे, तो निर्माण केला की राजकीय वर्चस्व मिळवून पक्षात स्थिर होता येईल, असे तेथील अध्यक्षांना वाटते. म्हणून सध्या हा उपद्व्याप सुरू आहे, असे कर्नल खासगीवाले म्हणाले.

चीन हा अतिशय कपटी देश आहे. तो तोंडावर एक बोलतो, मनात दुसरे आणि कृती वेगळीच करतो. अमेरिकेला विरोध करण्यासाठी त्याने तैवानवर डूख धरलेला आहे. तसाच डूख तो आपल्यावरही धरणार आहे.

आपल्यावर आणखी डूख वाढवण्यासाठी चीनने नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेकडेही हातपाय पसरायला सुरूवात केली आहे, पण भारतावर आक्रमण करून अमेरिकेला फारसा फरक पडणार नाही हे ते विसरतात.

चीनचे लक्ष दुसरीकडे गुंतवण्यासाठी अमेरिका दक्षिण चीन समृद्रामध्ये नक्कीच अशा हालचाली करेल. त्यामुळे आपल्याकडच्या कारवायांना चीनला थोडासा लगाम द्यावा लागेल, असेही त्यांनी सांगितले. वृत्तसंपादक एन. व्ही. निकाळे यांनी कर्नल खासगीवाले यांच्याशी संवाद साधला.