नाशिक | Nashik (विशेष प्रतिनिधी)

मानवी मन आणि मेंदू या गोष्टी वेगवेगळ्या नाहीत. त्या एकच आहेत. मेंदू आणि मन एकच असेल तर मग मन चांगले आणि सकारात्मक हवे की नको? नक्कीच हवे. मानवी मेंदू सर्वात पुढारलेला आहे. तो भाषेचे नियंत्रण करतो. मन अथवा मेंदू ज्या परिस्थितीत आहे त्या अनुषंगाने तो घडणार्या घटनांचा अर्थ लावतो. माणूस म्हटला की चुका होणारच.

प्रत्येक वेळी, प्रत्येकाशी, प्रत्येक ठिकाणी चांगलेच वागले पाहिेजे ही भावना कुठून येते? खरे तर असा विचार करणेसुद्धा त्रासाला कारण ठरते. म्हणून मनाचे आरोग्य महत्त्वाचे आहे, अशा शब्दांत नाशिकमधील प्रसिद्ध मनोविकारतज्ञ डॉ. मुक्तेश दौंड यांनी आनंदी जीवनासाठी मनाच्या आरोग्याचे महत्त्व विषद केले.

‘देशदूत’ डिजिटल आवृत्तीच्या ‘आमच्या गप्पा’ या साप्ताहिक उपक्रमात डॉ. दौंड पाहुणे होते. ‘मन करा रे प्रसन्न...’ हा आजच्या गप्पांचा विषय होता. वृत्तसंपादक एन. व्ही. निकाळे यांनी डॉ. दौंड यांच्याशी या विषयावर संवाद साधला.

अतिशय साध्या-सोप्या भाषेत डॉ. दौंड यांनी मन आणि मानवी जीवन याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. काही अभ्यासपूर्ण निरीक्षणेही नोंदवली. वेगवेगळ्या विषयांवर संवाद घडवून आणणारा ‘देशदूत’च्या ‘गप्पां’चा उपक्रम खूप चांगला आहे. असे उपक्रम नेहमीच घेतले जावेत, असे सांगून डॉ. दौंड यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

इंटरनेटमुळे जग जवळ आल्याने सध्या मानवी जीवनाचा वेग खूप वाढला आहे. जुन्या माणसांच्या अपेक्षा कमी होत्या. आपण मात्र जागतिक तुलना करतो. प्रचंड मोठी स्वप्ने पाहतो.

मनाच्या आरोग्यापुढील हा खरोखरच मोठा अडथळा आहे. आपण स्वत:च बंधने लादतो. नियमांचे कुंपण घालतो. मनाच्या त्रासाला तेच कारणीभूत ठरते, असे डॉ. दौंड म्हणाले. मानसिक ताण वाढत आहे.

आजकाल नातीसुद्धा ताणली गेली आहेत. ताणतणावामुळे चांगली माणसेसुद्धा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. आत्महत्या करणारा प्रत्येक माणूस मानसिकदृष्ट्या आजारी असतो असे नाही. तसेच मानसिक आजार असलेली माणूस आत्महत्या करील असेही नाही.

आपण आनंदी असलो तर सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या वाटतात. कुठलीही भावना तीव्र झाली की, ती मेंदूचा ताबा घेते. जितके मनाचे आणि मेंदूचे आरोग्य चांगले, तितके आपल्या विचारांवरचे, मनावरचे नियंत्रण योग्य राहते, असे डॉ. दौंड यांनी आवर्जून नमूद केले.