पावसाच्या प्रमाणात घट नव्हे वाढ

हवामानतज्ञ श्रीनिवास औंधकर यांच्याशी गप्पा
पावसाच्या प्रमाणात घट नव्हे वाढ

पाहुणे : श्रीनिवास औंधकर

विषय : पर्जन्यमान बदललं आहे का?

संचलन : एन. व्ही. निकाळे

नाशिक । विशेष प्रतिनिधी

पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे बोलले जाते, पण वस्तुस्थिती तशी नाही. भारतीय हवामान खात्याने गेल्या शंभर वर्षांतील पावसाची आकडेवारी उपलब्ध केली आहे. त्याच्या विश्लेषणातून हाती आलेल्या निष्कर्षांनुसार देशात पावसाचे प्रमाण कमी झालेले नाही.

उलट ते काहीसे वाढले आहे. वाढलेल्या कार्बनचे प्रमाण त्याला कारणीभूत आहे, असे वास्तव औरंगाबादच्या महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

दैनिक ‘देशदूत’च्या ‘आमच्या गप्पा’ या साप्ताहिक कार्यक्रमात औंधकर बोलत होते. ‘पर्जन्यमान बदललं आहे का?’ या विषयावरील चर्चेत त्यांनी आपली परखड मते आणि निरीक्षणे नोंदवली. वृत्तसंपादक एन. व्ही. निकाळे यांनी औंधकर यांच्याशी संवाद साधला.

सूर्यावरील सौरडागांचा पृथ्वीवरील हवामानावर होणार्‍या परिणामांबाबत औंधकर गेली चौदा वर्षे अभ्यास करीत आहेत. या अभ्यासानुसार पृथ्वीवर छोट्या हिमयुगासारखी परिस्थिती निर्माण होत आहे, असा दावाही त्यांनी केला. जागतिक तापमान वाढत नसून तापमानाची घसरण सुरू आहे. या वर्षी कडाक्याचा हिवाळा अनुभवायला मिळेल, असे संकेत मिळत असल्याचे औंधकर यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे 7 जूनला मोसमी पावसाचे आगमन होते. परंतु हवामान खात्याकडील उपलब्ध माहितीनुसार आता पावसाचे आगमन थोडे पुढे म्हणजे 10 जूनपर्यंत सरकले आहे. यावेळचा मोसमी पाऊस वेळेआधीच दाखल झाला.

पूर्वी ज्या भागात फार पाऊस पडत नव्हता तेथे आता मुसळधार पाऊस पडत आहे. आपल्याकडे चार महिन्यांचा पाऊस पाहिला तर पावसाळापूर्व आणि पावसाळी हंगाम संपल्यानंतर पाऊस येत आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण थोडे जास्त वाढले आहे, असेही औंधकर म्हणाले.

औरंगाबाद, नाशिक भागात किंवा इतरत्र दुष्काळात कृत्रिम पावसाचे प्रयोग राबवले जातात. डॉप्लर आणले जाते. पाऊस पाडण्यासाठी विमाने आणली जातात. त्यावर कोट्यवधी रुपये खर्ची होतात. मात्र ती विमाने केव्हा उडतात?

त्यानंतर नेमका किती कृत्रिम पाऊस पडला? याबाबत माहिती उपलब्ध होत नाही. एकूणच कृत्रिम पावसाबाबत गौडबंगालच पाहायला मिळते. जागतिक पातळीवरदेखील कृत्रिम पावसाचे प्रयोग पूर्णपणे यशस्वी ठरले, असा दावा अजून कोणीही करीत नाही, असेही औंधकर यांनी स्पष्टपणे सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com