Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedआमच्या गप्पा : 2 हजार वर्षांपूर्वीची भारतीय संस्कृती समृद्ध

आमच्या गप्पा : 2 हजार वर्षांपूर्वीची भारतीय संस्कृती समृद्ध

नाशिक । विशेष प्रतिनिधी

2 हजार वर्षांपूर्वीची भारतीय संस्कृती अतिशय समृद्ध आहे. त्यावेळची संस्कृती, त्यावेळची वास्तूकला, परंपरा, वेशभूषा, केशभूषा आदी अनेक सूक्ष्म गोष्टींचा अभ्यास व्हायला हवा. अजिंठा लेण्यांतील प्राचीन चित्रांचा छायाचित्रांच्या रुपाने जीर्णोद्धार करताना या सर्व गोष्टींचा अभ्यास मी करीत आहे….

- Advertisement -

नुसता अभ्यास होऊन उपयोग नाही. तो लोकांसमोरही जायला हवा. आपण किती थोर संस्कृतीत जन्मास आलो आहोत ते जगाला दाखवणे खूप गरजेचे आहे, असे उद्गार नाशिकचे भूमिपुत्र जागतिक कीर्तीचे चित्रकार आणि संशोधक छायाचित्रकार प्रसाद पवार यांनी काढले.

दैनिक ‘देशदूत’च्या डिजिटल व्यासपीठावरील ‘आमच्या गप्पा’ या साप्ताहिक कार्यक्रमात प्रसाद पवार सहभागी झाले. ‘माझा छायाचित्रकला प्रवास’ या विषयावरील चर्चेत पवार भरभरून बोलले. वृत्तसंपादक एन. व्ही. निकाळे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

भारतातील जागतिक वारसा असलेल्या अजिंठा लेण्यांतील पुरातन छायाचित्रांचे डिजिटायझेशन करून त्यांच्या जीर्णोद्धाराचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पवार यांनी हाती घेतला. केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्व विभाग, केंद्रीय सांस्कृतिक विभाग आदींच्या सहकार्यातून तो प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. त्याचीही माहिती पवार यांनी दिली.

नाशिकच्या चित्रकला महाविद्यालयात पदवी शिक्षण घेत असताना पहिल्या वर्षीच अजिंठा लेण्यांच्या जतनाबाबतचे बीज रोवले गेले. अजिंठा प्रकल्प 30 वर्षे आयुष्याला चिकटून राहील, असे वाटले नव्हते. मात्र त्यावेळी केलेला विचार सत्यात उतरवण्यासाठी निर्धाराने कामाला लागलो. उतावीळपणा न दाखवता वेळ येईपर्यंत तुम्ही थांबायचे असते.

अजिंठ्यातील चित्रांच्या जीर्णोध्दाराचा हाती घेतलेला वसा अजून कायम आहे. त्यावर अजूनही काम सुरू आहे. त्यात आता संशोधनाचा भाग जोडला गेला आहे, असे पवार यांनी सांगितले.

जगातील बुद्धिष्ट सर्किट असणार्‍या देशांतील महत्त्वाच्या राजधान्यांमध्ये ‘प्रसाद पवार फाऊंडेशन’कडून म्युझियम तयार करण्याचे काम चालू आहे. श्रीमंती फक्त पैशांत मोजून चालणार नाही. पैसा ही गोष्ट क्षणभंगूर आहे.

मग शाश्वत काय आहे? जगाला कोणती गोष्ट आपण देऊ शकतो? सध्या जगभर झाडे वाचवा, पर्यावरण वाचवा, पाणी वाचवा आदी उपक्रम चालू आहेत. अजिंठा वाचवणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. आम्ही कला वाचवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. अंगणात येणारे पक्षी, विविध पाने-फुले, गड-किल्ले आदी कितीतरी गोष्टी आपल्यासाठीच आहेत.

अजिंठा, वेरूळची लेणी, ताजमहाल आपलेच आहेत. अशा श्रीमंत संस्कृतीत आपण राहतो ते जगातील लोकांना कधी कळणार? पैसा वाचू शकत नाही, पण भारतीय संस्कृती अद्भूत, अस्सल आणि ताकदीची आहे. या सगळ्या गोष्टी आनंददायी आहेत, अशा शब्दांत प्रसाद पवार यांनी भारतीय संस्कृतीची थोरवी सांगितली.

- Advertisment -

ताज्या बातम्या