देशदूत ‘आमच्या गप्पा’ : ऑनलाईन शिक्षणाची दिशा

सहभाग : प्राचार्य डॉ. किशोर पवार, संचलन : एन. व्ही. निकाळे
देशदूत ‘आमच्या गप्पा’ : 
ऑनलाईन शिक्षणाची दिशा

नाशिक । एन. व्ही. निकाळे

वर्गातील शिक्षणाइतके ‘ऑनलाईन’ शिक्षण प्रभावी नाही. वर्गातील शिक्षणाला पर्याय नाही. तथापि ‘करोना’ संकटामुळे ‘ऑनलाईन’ शिक्षणाचा पर्याय स्वीकारावा लागला आहे.

त्यात अनेक अडचणी येत आहेत, पण त्यावर मात करता येईल. सर्व व्यवहार सुरळीत होईपर्यंत तरी हा पर्याय स्वीकारावा लागेल, असे मतप्रदर्शन प्राचार्य डॉ. किशोर पवार यांनी केले.

‘देशदूत’ डिजिटल आवृत्तीच्या ‘आमच्या गप्पा’ कार्यक्रमात डॉ. पवार बोलत होते. ‘ऑनलाईन’ शिक्षणाची व्यवस्था याआधी करता आलेली नाही. वर्गातील शिक्षणात सध्या बर्‍याच अडचणी आहेत.

त्यांची सोडवणूक अजून पुरेशी होऊ शकलेली नाही. अशावेळी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आला आहे. महाराष्ट्रात ‘डिजिटल शाळां’चा प्रयोग सुरू आहे.

या शाळांचाही ‘ऑनलाईन’ शिक्षणात उपयोग होऊ शकेल, पण त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना तयार करावे लागेल. आवश्यक गोष्टींची उपलब्धता झाल्यावर घरी बसून त्यांना शिक्षण देता येईल, असे डॉ. पवार म्हणाले.

स्मार्टफोन, संगणक, लॅपटॉप, इंटरनेट अशा आधुनिक सुविधा सधन कुटुंबातील मुलांना सहज उपलब्ध होऊ शकतात. गोरगरिबांच्या मुलांना त्या मिळणे अवघड आहे. सरकारने पुढाकार घेऊन स्वस्तातील टॅब, इंटरनेट आदी सुविधा पुरवल्या तर गरीब मुलांनाही ‘ऑनलाईन’ शिक्षणाच्या प्रवाहात आणता येईल.

सरकारने पावले उचलल्यास काही सकारात्मक गोष्टी नक्कीच घडू शकतील. साधनांची पूर्तता झाल्यास ‘ऑनलाईन’ शिक्षणाचा पर्याय उपयोगी ठरू शकेल, असा आशावाद डॉ. पवार यांनी व्यक्त केला.

अंतिम परीक्षांबाबत राजकारण होता कामा नये. तो राजकारणाचा विषय नाही. करोना संसर्गात परीक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोक्याचे आहे. म्हणून राज्य सरकारचा परीक्षा न घेण्याबाबतचा निर्णय समर्थनीय ठरतो, असेही डॉ. पवार यांनी ठामपणे सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com