… अन्यथा मालमत्ता करणार जप्त

0
नाशिक | दि.३० प्रतिनिधी – महापालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांची यादी तयार केली असून त्यांना थकबाकी प्रकरणी अंतिम नोटीस बजावण्यात येणार आहे. नोटिसा देऊनही थकबाकी न भरल्यास थेट मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. शहरात ४७ हजार थकबाकीदारांकडे जवळपास ४५ कोटींची थकबाकी आहे. उद्या शुक्रवारपासून नोटिसा पाठवल्या जाणार आहेत.

महापालिकेने उत्पन्न वाढवण्यासाठी मालमत्ता व पाणीपट्टी करवसुलीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पाणीपट्टी थकवणार्‍यांविरोधात मोहीम हाती घेतल्यानंतर आता मालमत्ता करवसुलीसाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. गेल्यावर्षीची ३१ कोटी ६७ लाख आणि चालू वर्षातील बड्या थकबाकीदारांकडे असलेली १२ कोटी ८८ लाखांच्या थकबाकी वसुलीसाठी पालिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

गेल्यावर्षीचे आणि सध्याचे थकबाकीदार मिळून ४७ हजार ४१५ मालमत्ताधारकांना अंतिम नोटीस काढण्याची तयारी केली आहे. या सर्वांकडे जवळपास ४४ कोटी ५६ लाखांची थकबाकी असून या सर्व थकबाकीदारांकडे दहा हजारापेक्षा जास्तीची थकबाकी आहे. या सर्व थकबाकीदारांना येत्या उद्या शुक्रवारपासून अंतिम नोटिसा बजावल्या जाणार आहेत.

त्यांना थकबाकी जमा करण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला जाणार आहे. अल्टिमेटमनंतरही थकबाकी भरली नाही तर थेट मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

नव्या मिळकतींकडे लक्ष
नव्याने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सुमारे ५८ हजार मालमत्ता नव्याने आढळून आल्या आहेत. त्या सर्व मालमत्तांची छाननी पूर्ण झाली असून त्यांनाही वसुलीसाठी नोटिसा पाठवण्याचे काम सुरू झाले आहे. ज्या मालमत्तांधारकांकडे पालिकेचे भोगवटा प्रमाणपत्र नाही त्या सर्वांकडून गेल्या सहा वर्षांपासूनचा मालमत्ता कर वसूल केला जाणार आहे. तर ज्यांच्याकडे भोगवटा प्रमाणपत्र आहे परंतु त्यांची नोंदणी झालेली नाही अशा मालमत्ताधारकांकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या तारखेपासून वसुलीच्या नोटिसा पाठवल्या जाणार आहेत. त्यामुळे यातूनही पालिकेला ५० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळण्याची आशा आहे.

१० कोटींचा महसूल वाढला
गेल्या दोन महिन्यांत पालिकेने पाणीपट्टीच्या ६७ हजार थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यांच्याकडून ८ कोटी ७८ लाखांची अधिकची वसुली झाली आहे. पाणीपट्टीची नियमित वसुली २३ कोटी ५८ लाख झाली असून पालिकेच्या कारवाईमुळेे गेल्यावर्षापेक्षा दहा कोटींनी अधिक वाढ झाली आहे. आतापर्यंत पालिकेच्या तिजोरीत ५९ कोटी १९ लाखांची वसुली झाली आहे. परंतु तरीही चालू वर्षात जवळपास ५० कोटींची थकबाकी आहे. तर गेल्यावर्षीची ३१ कोटींची थकबाकी आहे.

LEAVE A REPLY

*