कोरोना उपचारासाठी एक्स-रे, रक्त चाचणीच पुरेशी

केंद्रीय पथकाने आरोग्य यंत्रणेला फटकारले
कोरोना उपचारासाठी एक्स-रे, रक्त चाचणीच पुरेशी

औरंगाबाद - Aurangabad

गरज नसतानाही बहुतांश कोरोना रूग्णांच्या एचआरसीटी चाचण्या केल्या जात असल्याचे केंद्रीय पथकाच्या निदर्शनास आले. यावर पथकाने तीव्र नाराजी व्यक्त करत शहरातील सरकारी व खासगी आरोग्य यंत्रणेला चांगलेच फटकारले. रुग्णांमधील लक्षणे आणि रक्त चाचणीचा अहवाल या दोन गोष्टीच कोरोनाच्या उपचारासाठी पुरेशा आहे. तेव्हा उगाच रुग्णांना सर्रासपणे एचआरसीटी चाचणी करायला भाग पाडू नये, अशी स्पष्ट ताकीद पथकातील तज्ज्ञांनी दिली.

शहरात मागील दीड महिन्यापासून कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत असून मृतांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे एक पथक मागील दोन दिवसांपासून शहरात पाहणी करत आहे. दरम्यान तिसर्या दिवशी शनिवारी दोन सदस्यीय पथकाने घाटी रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महापालिकेच्या मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरची पाहणी केली. पथकात दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पीटलमधील छातीविकार तज्ज्ञ डॉ. दीपक भट्टाचार्य आणि भोपाळ येथील एम्सचे डॉ. अभिजित पाखरे यांचा समावेश आहे. यावेळी पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांच्यासह घाटी व जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर सोबत होते. बहुतांश कोरोना रुग्णांना शहरात एचआरसीटी चाचणी करायला भाग पाडले जात आहे. त्यासाठी रुग्णांना प्रत्येकी अडीच ते चार हजार रुपयांचा खर्च पेड करावा लागत आहे. मात्र, अशा पद्धतीने सर्रास चाचण्या करणे चुकीचे असल्याचे निरीक्षण डॉ. भट्टाचार्य यांनी नोंदविले.

अपवादात्मक परिस्थितीतच एचआरसीटी करा : एचआरसीटी केल्यामुळे उपचारात कोणताही बदल होत नाही. त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीतच एचआरसीटीचा वापर करावा. एरव्ही एक्स-रे करणेच पुरेसे आहे. याबाबत शहरातील सर्व खासगी डॉक्टर्स, रूग्णालयांना ताकीद द्या, अशी सूचना देखील केंद्रीय पथकाने पालिकेच्या आरोग्य विभागाला केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com