शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करणार-कुलगुरू डॉ.इंद्रमणी

शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करणार-कुलगुरू डॉ.इंद्रमणी

औरंगाबाद - aurangabad

शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा (Modern technology in agriculture) वापर वाढविण्यासाठी कृषि विद्यापीठ प्रयत्नशील आहे. ड्रोन तंत्रज्ञानाबाबत युवकांना प्रशिक्षण देण्यात येत असून शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांनी केले.

कृषि तंत्र विद्यालय, केव्हीके येथे आयोजित राज्यस्तरीय कृषि प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी कुलगुरू डॉ. इंद्रमणी बोलत होते. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे, आमदार सतीश चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर, विभागीय कृषि सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव, एसआयएएमचे अध्यक्ष समीर मुळे, उद्योजक रामचंद्र भोगले, विजय बोराडे, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. टी. जाधव, डॉ. एस. बी. पवार, समन्वयक ॲड. वसंत देशमुख आदी उपस्थित होते.

कुलगुरू डॉ.इंद्रमणी म्हणाले, शेती क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने होणारे बदल शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषि प्रदर्शन महत्वाचे ठरणार आहे. शेती क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व घटकांचा सहभाग घेत शेतीचा विकास साधायचा आहे. कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान तसेच बाजारपेठेबाबत अद्ययावत माहिती देण्यासाठी विद्यापीठ सातत्याने प्रयत्न करणार आहे.

शेतकरी बांधवांच्या सर्वांगिण विकासासाठी सर्व मिळून प्रयत्न करुया असे सांगून कुलगुरू डॉ. इंद्रमणी म्हणाले, शेतीला चांगले भविष्य आहे. कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून सद्यस्थितीत परभणी जिल्ह्यात 600 युवकांना आधुनिक शेती तसेच ड्रोन तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. मराठवाड्यातील इतरही जिल्ह्यांत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे म्हणाले, शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहे. कृषि प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवतंत्राची माहिती मिळणार आहे.

आमदार सतीश चव्हाण म्हणाले, नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यत पोहचविण्यासठी हे कृषि प्रदर्शन महत्वाचे ठरणार आहे. यावेळी उद्योजक रामचंद्र भोगले, डॉ. देवसरकर यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी शास्त्रज्ञ, कृषि तज्ज्ञ व शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com