सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम मिळेल तरी कधी?

निवृत्त कर्मचारी चिंताग्रस्त
सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम मिळेल तरी कधी?

औरंगाबाद - Aurangabad

निवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची २०२०-२१ची थकीत रक्कम अद्याप मिळालेली नाही. चालू वर्षातील रकमेबाबत निश्चिती नसल्याने पेन्शनधारकांना चिंता सतावते आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, इतर उपचार अशावेळी उपचारांसाठी हक्काचा निधी मिळत नसल्याने नाराजी आहे.

शासनाच्या विविध विभागांमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम राज्य शासनाने जाहीर केली. पाच टप्पे करून ही रक्कम दिली जाणार आहे. त्याचा पहिला हप्ता शासनाने मान्य केल्याप्रमाणे दिला, परंतु दुसरा हप्ता मिळाला नाही. कोरोनाचा राज्यात वाढलेला प्रादुर्भाव, राज्याच्या तिजोरीवर वाढलेला खर्चाचा भार अशा कारणांमुळे या थकीत रकमेचा हप्ता मिळाला नाही. राज्याची परिस्थिती विचारात घेत कर्मचाऱ्यांनीही ते मान्य केले, परंतु आता दुसऱ्या हप्त्यासह थकित रक्कम वेळेत मिळणार की, नाही याबाबत त्याबाबत त्यांना चिंता सतावते आहे. शासनस्तरावरून त्याबाबत हालचाली नसल्याचे निवृत्त कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी अशा विविध पदावरून निर्माण झालेल्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

पेन्शनरच्या गरजा लक्षात घेता असे लक्षात आले की, मागील वर्षीचा हप्ता थकित आहे. आता २०२१-२२ चा हप्ता जून महिन्यात देणे आहे. हे दोन्ही हप्ते जूनमध्येच देण्यात यावेत. अनेक पेन्शनरांचा मृत्यू झाला आहे. त्यांना त्यांच्या पैशाचा काही उपयोग झाला नाही. तसेच जे जिवंत आहेत, त्यांना औषध उपचारासाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे सरकारने दोन्ही हप्ते सोबत द्यावेत असे बी. व्ही. जाधव, आर. पी. म्हस्के, के. आर. आगडे, बी. एस. तरटे, एन. एम. दारवंटे, एस. डी. चव्हाण, आर. एस. माळवदकर आदींनी मागणी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com