औरंगाबादकरांना पुरेशा लसी मिळणार कधी?

लाखावर लोकांना दुसऱ्या लसीची प्रतीक्षा 
औरंगाबादकरांना पुरेशा लसी मिळणार कधी?

औरंगाबाद- Aurangabad

कोरोना संकटावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र, लशींचा पुरेसा पुरवठा नसल्याने अनेक नागरिकांना लस न घेताच केंद्रावरून परत जावे लागत आहे. शहरातील दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांची संख्या आता एक लाखाच्या जवळ पोहोचली आहे. लस पुरवठा आणि प्रतिक्षेत असलेले नागरिक या संख्येत मोठी तफावत असल्याने या नागरिकांना लस कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित राहिला आहे.

महापालिकेने शहरात लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत पाच लाख 45 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. नागरिकांनी पहिला डोस घेऊन शंभरपेक्षा अधिक दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु, लशीचा तुटवडा असल्याने लस घेण्यास अडचणी येत आहे. 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली.

सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षांवरील नागरिक आणि त्यानंतर 18 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरू करण्यात आले. मोहिमेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे. परंतु, पुरेसा लशींचा पुरवठा होत नाही. लसीकरणासाठी महापालिकेने शहरात जम्बो लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेऊन 115 वॉर्डात प्रत्येकी या प्रमाणे लसीकरण केंद्र सुरू केले. परंतु, लशीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक केंद्रे बंदच राहत आहेत. जुलैमध्ये केवळ सहा दिवस लसीकरण झाले आहे. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची यादी वाढतच चालली आहे.

लशींचा पुरवठा पुरेशा प्रमाणात येत नसल्याने दुसऱ्या डोससाठी नागरिकांना प्राधान्य देण्यात येत आहे. परंतु, त्यानंतरही पुरेशी लसच उपलब्ध होत नसल्याने प्रतिक्षेतील नागरिकांची संख्या वाढत आहे. हा आकडा 95 हजारांच्या पुढे गेला असल्याचे सांगण्यात येते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com