Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedनववर्षाचे स्वागत घरी बसूनच!

नववर्षाचे स्वागत घरी बसूनच!

मुंबई l Mumbai (प्रतिनिधी)

कोरोनाचे संकट कायम असल्याने नागरिकांना नववर्षाचे स्वागत घरी बसून करावे लागणार आहे. राज्य सरकारने नववर्षाच्या स्वागतानिमित्त होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीवर बंदी घालताना सरकारने नागरिकांना नव्या वर्षाचे स्वागत साधेपणाने करण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

नवीन वर्षाचे स्वागत अत्यंत उत्साहात केले जाते. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नागरिक गर्दी करतात. मात्र, यावेळी कोरोनाच्या संकटामुळे ५ जानेवारीपर्यंत रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

कोरोनाची स्थिती लक्षात घेता ३१ डिसेंबर रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे असे गृह विभागाने म्हटले आहे.

मुंबईत गेट वे आँफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहु चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी गर्दी होते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी. दहा वर्षाखालील मुले आणि ६० वर्षांच्यावरील ज्येष्ठांनी घराबाहेर जाणे टाळावे, असे परिपत्रकात नमूद केले आहे.

नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नको तसेच मिरवणुकांही काढू नयेत. तसेच धार्मिकस्थळांवर एकाच ठिकाणी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना गृह विभागाने दिल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या मदत आणि पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे गृह विभागाने म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या