औरंगाबादमध्ये लसीसाठी भटकंती

कोविशिल्ड लसींचा साठा संपला
औरंगाबादमध्ये लसीसाठी भटकंती

औरंगाबाद - Aurangabad

दोन महिन्यापूर्वी कोरोनाच्या (Corona) दुसर्‍या लाटेत रुग्णांची संख्या अधिकची वाढल्याने शहरभरात बेडस्साठी रूग्णांसह नातेवाईकांना भटकंती करावी लागत होती. तर आता कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccine) मिळत नसल्याने नागरिकांना शहरभरातील लसीकरण केंद्रांवर धावाधाव करावी लागत आहे.

अनेकांचे शासनाने ठरवून दिलेले 84 दिवस संपून गेले आहे. असे नागरिक दररोज चौकशी करत असून त्यानंतरही डोस मिळत नसल्याने त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पहिल्या डोससाठी देखील नागरिकांची ओरड सुरू आहेत. या स्थितीत शासनाकडून लसींचा पुरवठा होत नसल्याने महापालिका देखील हतबल झाली आहे.

शासनाकडून लसीकरणाचा टक्‍का वाढवण्याच्या सूचना केल्या जात आहेत. मात्र लसींचा पुरवठाच होत नसल्याने लसीकरणाच्या मोहिमेला ब्रेक लागला आहे. औरंगाबाद पालिकेने आजवर पाच लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. मात्र तरीही त्यात दोन्ही डोस घेणार्‍यांची संख्या केवळ सव्वा लाखांच्या घरात आहे. आठवडाभरासाठी किमान एक लाख लसींचे डोस मिळावेत, अशी पालिकेची मागणी आहे. मात्र केवळ 10 ते 15 हजार लसी दिल्या जात आहेत.

पालिकेने दररोज 15 ते 20 हजार लसीकरण करण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. परंतु, लसींचा साठा नसल्याने लसीकरणाला वाारंवाार ब्रेक लागत आहे. 18 वर्षापुढील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्यापासून शहरातील लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागत आहेत. त्या अद्याप कायम आहेत. शहरातील दुसरा डोसचे अनेक नागरिकांचे 84 दिवस संपले आहेत. त्यामुळे ते सध्या हवालदिल झाले आहेत. अनेकजण पहाटे पाच वाजेपासूनच पालिकेच्या लसीकरण केंद्रावर टोकन घेण्यासाठी रांगेत थांबत आहेत. उशीर केल्यास टोकन मिळणार नाही म्हणून, तब्बल पाच तास नागरिक केंद्रावर बसून राहत असल्याचे चित्र आहे.

लसीकरण केंद्रांवर टोकन वाटप संपल्यानंतर रांगेतील उर्वरित नागरिक पालिका कर्मचार्‍यांसोबत रोज हुज्जत घालत आहेत. आम्हाला लस हवी, अन्यथा येथून जाणार नाही, अशी भूमिका अनेकजण घेत आहेत. त्यांची समजूत काढताना कर्चमार्‍यांच्या नाकीनऊ येत आहे. त्यामुळे पालिकेने प्रत्येक केंद्रासाठी पोलीस बंदोबस्त मागितला आहे. काही केंद्रावर बंदोबस्त मिळाला आहे, तर अनेक ठिकाणी बंदोबस्तच नसल्याने कर्मचार्‍यांची अडचण झाली आहे.

कोविशिल्ड लसींचा साठा आता संपला आहे. तर कोव्हॅक्सीनचा देखील साठा शिल्लक राहिलेला नाही. आजवर पालिकेने कोवॅक्सीन लसीसाठी तीन केंद्र सुरू केले होते, तेथे पहिला व दुसरा डोस दिला जात होता. शहरात 18 वर्षावरील नागरिकांची संख्या अंदाजे 10 लाख एवढी असल्याचे मानले जाते. त्यानुसार अजून 20 लाख डोसची गरज आहे.

कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 84 दिवसांचे केल्यानंतर पालिकेकडे लसींचा साठा होता. त्यानुसार मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लसीकरण करण्यात आले. आता दुसर्‍या डोससाठी वेटिंगवर असणार्‍यांची संख्या प्रतिदिन 10 ते 15 हजारांनी वाढत जात आहे. बुधवारचा आकडा 55 हजारांच्या घरात होता. पाच हजार लसी मिळत असताना त्या 55 हजार नागरिकांना कशा देणार? या विवंचनेत पालिका आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com