औरंगाबादमधील 4 लाख मुलांचे लसीकरण

'हर स्कूल, कॉलेज दस्तक मोहीम
औरंगाबादमधील 4 लाख मुलांचे लसीकरण

औरंगाबाद- Aurangabad

ओमायक्रॉनच्या संकटातही लसीकरणावरच भर देणे आवश्यक आहे. त्यामुळे 3 जानेवारीपासून जिल्ह्यातील 15 ते 18 वयोगटातील सुमारे 4 लाख मुला-मुलींचे लसीकरण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. तसेच यापूर्वी 2 डोस घेतलेल्या व सहव्याधी असलेल्या जिल्ह्यातील सुमारे एक लाख ज्येष्ठ नागरिकांनाही बूस्टर (तिसरा) डोस देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

ओमायक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठी लसीकरणावर भर देणे आवश्यक आहे. दुसऱ्या डोसचे नियोजन काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. 60 वर्षावरील नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करण्याबरोबरच 15 वर्षावरील मुलांच्या लसीकरणासाठी तसेच आरोग्य सेवेतील कर्मचारी (फ्रंटवर्कर) यांच्या 3 जानेवारीपासून 2022 सुरू होणाऱ्या लसीरकरणाचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड टास्क फोर्सची बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महानगरपालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, पोलीस अधीक्षक निमित गोयल, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप कुलकर्णी, मनपा आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा,तसेच जिल्हा टास्क फोर्स समितीचे सर्व सदस्य, विभागप्रमूख यांच्यासह घाटी रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महानगरपालिकेतील आरोग्य यंत्रणेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनूसार जिल्ह्यात 3 जानेवारीपासून 15 वर्षे पूर्ण झालेल्या मूलांचे लसीकरण करण्याचे नियोजन आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासनाने करावे. यामध्ये हर घर दस्तक प्रमाणेच हर स्कूल/कॉलेज दस्तक या उपक्रमांतून मूलांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी आरोग्य व शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाने लसीरकणासाठीचे सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश चव्हाण यांनी दिले.

ओमायक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठी शहरात विना मास्क फिरणाऱ्या एकूण 325 वाहनधारकांना परिवहन विभागाकडून नोटीसा बजावण्यात आल्या असून 1 हजार 180 विनामास्क फिरणाऱ्या वाहनधारकांचे फोटो महानगरपालिकेकडून कारवाईसाठी परिवहन विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. ह्या वाहन धारकाच्या वाहनांच हस्तांतरणही बंद करण्यात आले आहे.

31 डिसेंबरच्या अनुषंगाने नागरिकांनी गर्दी टाळावी म्हणून हॉटेल व रेस्टारंट क्षमतेच्या 50 टक्के तसेच लग्न समारंभ येथे 100 व्यक्ती उपस्थित राहू शकतात याबाबत दि.25 डिसेंबर रोजी टास्क् फोर्स समितीने जो निर्णय घेतला आहे, त्याप्रमाणे सर्व नियमावली जिल्ह्यासाठी लागू असणार असल्याचे देखील जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com