केंद्रीय पथकाच्या सूचनेनंतर सिटीस्कॅनच्या नियमात बदल 

रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापरही गरजेनुसारच
केंद्रीय पथकाच्या सूचनेनंतर सिटीस्कॅनच्या नियमात बदल 

औरंगाबाद - Aurangabad

जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोनाच्या चाचण्या करण्यात येत असून त्याव्दारा कोरोनाचे अचूक निदान होत आहे. तरी कोरोनाचे निदान करण्यासाठी सिटीस्कॅन (एचआरसीटी) करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या.


जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोनाच्या निदानासाठी करण्यात येत असलेल्या सिटीस्कॅनच्या तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापरासंदर्भातील नियमावलीबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, आयएमएचे डॉ. व्ही. रंजलकर, डॉ. यशवंत गाडे, निमाचे डॉ. गिरीश डागा, डॉ. प्रवीण बेरड, डॉ. विजय चौधरी, रेडीओलॉजिस्ट संघटनेचे डॉ. शरद कोंडेकर आदी उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात कोरोना आढावासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने देखील याकडे लक्ष देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार जिव्हा प्रशासनाने वरील सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, सिटीस्कॅनचा वापर आवश्यक असेल अशा ऑक्सीजन पातळी कमी झालेल्या, इतर गंभीर स्थितीतील कोरोना बाधितांसाठीच केला जावा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

मोठ्या प्रमाणात गरज नसताना कोरोना निदानासाठी लोकांकडून सिटीस्कॅन केल्या जात असल्याने जिल्ह्यातील सिटीस्कॅन केंद्र समूह संसर्गाचे प्रमुख ठिकाण बनले आहे. याबाबत अनावश्यक सिटीस्कॅन थांबवण्याच्या सूचना केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील पाहणी दौर्‍यानंतर दिलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरटीपीसीआर चाचणीचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त असलेल्या तसेच उपचार करत असलेल्या संबधिंत डॉक्टरांनी संदर्भित केलेल्या तसेच आवश्यकता असलेल्या कोरोना बाधितांचेच सिटीस्कॅन करावे, ते केलेल्या रूग्णांची माहिती संबधित केंद्रानी महानगरपालिकेकडे नियमितपणे सादर करावी अशा सूचना त्यांनी केल्या. शासन दरानुसार खाजगी रुग्णालयांनी कोरोना उपचार करणे बंधनकारक असून अवाजवी दर आकारणार्‍या रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापरही गरजेनुसार कोरोना उपचार नियमावली प्रमाणे करणे बंधनकारक असून रुग्णांच्या उपचारामध्ये करण्यात आलेल्या इंजेक्शनच्या वापराबाबतची माहिती सादर करावी, आवश्यकतेनुसार योग्य प्रमाणात योग्य वेळी ते रुग्णाला उपलब्ध करुन द्यावे. गंभीर स्थितीतील रुग्णाला दाखल करुन घेतांना रूग्णाच्या तब्येतीला स्थिर करण्यास प्राधान्य देवून त्यानंतर रुग्णालयात दाखल करुन घेण्याच्या आर्थिक बाबींची पूर्तता, किंवा परिस्थितीनुसार दुसरीकडे संदर्भित करण्याबाबतची प्रक्रिया करावी. खासगी रुग्णालय (डीसीएचसी) मधील कोरोना रुग्णांच्या मृत्यूबाबतची माहिती रुग्णालयांनी महानगरपालिकेकडे सादर करावी, अशा रुग्णालयातील मृत्यूंचे विश्लेषण यंत्रणेमार्फत केल्या जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सूचित केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com