रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे दोघे जेरबंद 

परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांची लूट   
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे दोघे जेरबंद 

औरंगाबाद - Aurangabad

राज्यात सध्या लॉकडाऊन असल्याने परराज्यातील अनेकजण आता आपल्या गावाकडे निघाले आहेत. परराज्यात जाणार्‍या प्रवाशांसाठी तत्काळमध्ये रेल्वे तिकीट काढून त्याचा काळाबाजार करणार्‍या दोघांना रेल्वे सुरक्षा दलाने शनिवारी दुपारी अटक केली.

कल्पेश सखाराम माळी (37, रा. शिर्डी), छगन खैरू राठोड (41, रा. पदमपूरा) अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे आरोपींपैकी छगन राठोड हा रेल्वे विभागाला संगणक तज्ज्ञ पुरविणार्‍या संस्थेमध्ये काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. कन्नड येथील एका पोस्ट ऑफीसमधील रेल्वे तिकीट केंद्र येथे रेल्वे तिकीटाचा काळाबाजार करण्यात येत असल्याची माहिती शर्मा यांना मिळाली हेाती.

या आधारे उपनिरिक्षक के. चंदुलाल, सहाय्यक निरिक्षक विजय वाघ यांच्यासह आरपीएफ कर्मचारी यु.आर. डोभाल, हनुमान मिना आणि सुरज बाली यांनी सापळा रचून शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास तिकीटाचा काळाबाजार करित असताना, कल्पेश माळी आणि छगन राठोड या दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन वातानुकूलीत आणि दोन स्लीपरच्या तिकीट असे 11 हजार 660 रुपयांची तिकीट जप्त केली आहे.

या दोघांना अटक करण्यासाठी आरपीएफ पथक गेल्या तीन दिवसांपासून प्रयत्नात होते. अखेर शनिवारी सकाळी या दोघांना रंगेहात तिकीट घेताना अटक करण्यात आली. या प्रकरणात आरपीएफ कार्यालयात रेल्वेचे काळा बाजार करणार्‍या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी छगन राठोडवर यापूर्वी म्हणजे 2017 ला देखील अशाच तिकीटांचा काळाबाजार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. तरी देखील तो सध्या त्याच कंपनीत काम करित असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

तिकिटांचा काळाबाजार करणारा राठोड हा रेल्वेने कॉन्ट्रक्ट दिलेल्या एका कम्प्युटर मॅनेजमेंट सिस्टीम कंपनीत कर्मचारी आहे. तत्काळ तिकीट काढण्यासाठी पीआरएस सेंटरला लिंक पाठविण्यात येत असते. ही लिंक रेल्वे विभागाच्या संबंधित असलेल्या संगणक विभागात काम करणार्‍या छगन राठोडला मिळत होती. या लिंकवरून जास्त गर्दी नसलेल्या रेल्वे तिकीट विक्री केंद्रावर कन्फर्म तिकीट काढण्यात येत होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com