Photo चला पर्यटनाला : औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळं

आज जागतिक पर्यटन दिन
Photo चला पर्यटनाला : औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळं
म्हैसमाळ

औरंगाबाद : संदीप तीर्थपुरीकर Aurangabad

औरंगाबादपासून २८ किलोमीटर अंतरावर असलेला खुलताबाद परिसर पर्यटकांना खुणावतेय. तर चला भटकंतीला! दररोजच्या धकाधकीच्या जीवनात उसंत काढत चाकोरीबाहेरचा एक दिवस. हे सारं आपल्या शहरानजीक करता येईल. दिवसभर भटकंतीची मजा लुटून रात्री आपण घरी परत येऊ शकतो.

आपल्या स्वतःच्या वाहनाने, खासगी वाहनाने अथवा एस. टी. बसने दौलताबाद, खुलताबाद, सुलीभंजन, वेरूळ, म्हैसमाळ येथे पर्यटनाला चालना देणारी स्थळे आहेत. आमदार प्रशांत बंब यांच्या पुढाकाराने पर्यटन प्राधिकरणाच्या माध्यमातून पर्यटकांना आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यासाठी निधीचीही तरतूद करण्यात येत आहे.

यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करून पर्यटन विकासाला चालना देणारा हा प्रकल्प ठरणार आहे. औरंगाबाद शहरापासून जवळ असलेल्या पर्यटनस्थळे.

दौलताबादचा देवगिरी किल्ला Daulatabad

दौलताबाद (१४ कि.मी.) औरंगाबाद येथून सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावर १४ किलोमीटरवर दौलताबाद आहे. दौलताबादचा देवगिरी किल्ला अजिंक्य, अभेद्य आहे. चढाई करत दमछाक करणारा हा किल्ला पाहतांना वनराईमध्ये असलेल्या मोरांचे दर्शन आपल्याला होईल. किल्ल्यासमोर वन उद्यान असून येथे विसावा घेत मुलांना मनसोक्त खेळण्याचा आनंद घेता येईल.

सुलीभंजन

सुलीभंजन (२८ कि.मी.) – खुलताबाद बायपास रस्त्याने जातांना सुलीभंजनकडे जाणारी कमान दिसेल. या ठिकाणी श्री. दत्तात्रय मंदिर आहे. उंच टेकडीवर हे मंदिर असून येथून देवगिरी किल्ला, औरंगाबाद शहर, एमआयडीसी वाळूज, जायकवाडी प्रकल्पाचे विलोभनीय दुश्य पाहायला मिळते. वेगवेगळे आवाज येणारी शिळा येथील वैशिष्ट्य आहे.

परीयों का तालाब

येथील दर्ग्याच्या मागे एक भव्य तलाव असून 'परीयों का तालाब' म्हणून तो ओळखला जातो. हा तलाव हिंदू–मुस्लीम एकतेचे प्रतिक आहे. दर्गा परिसरात सुमारे ८०० वर्षांपूर्वीचे जुनी झाडे आहेत.

भद्रा मारुती मंदिर Bhadra Maruti

खुलताबाद (२८ कि.मी.) - निद्रिस्त झोपलेल्या अवस्थेतील जागृत हनुमान श्री भद्रा मारुतीचे मंदिर आहे. हे दैवत भक्तांच्या नवसाला पावणारे आहे, अशी भाविकांची दृढ श्रध्दा आहे. दर शनिवारी येथे भक्तांची मोठी गर्दी असते.

औरंगजेब कबर

खुलताबाद येथे मोगल बादशहा औरंगजेब यांची कबर आहे. औरंगजेबाची राहणी अतिशय साधी व मनोवृत्ती पूर्णपणे धार्मिक होती. आपला वैयक्तिक चरितार्थ तो स्वतः विणलेल्या टोप्या आणि पवित्र ग्रंथाच्या हस्तलिखित प्रति विकून चालवीत असे. हातात सतत जपमाळ बाळगून नामस्मरण करण्याचा त्याचा स्वभाव होता. वयाच्या ६२ व्या वर्षी पाच लाख सैन्यदल घेऊन तो महाराष्ट्रावर चालून आला. वयाच्या ८८ व्या वर्षी अहमदनगरजवळील भिंगारजवळ १७०७ मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्या इच्छेनुसार त्याचे धार्मिक गुरु ख्वाजा जैनोद्दीन शिराजी यांच्या समाधीजवळ चिर समाधीत विसावला.

बनी बेगम बगीचा, खुलताबाद– औरंगजेबाची नातसून बनी बेगम यांच्या नावाने सुंदर बगीचा आहे. या ठिकाणी फुलझाडे असून हे रमणीय ठिकाण आहे.

निजामकालीन विश्रामगृह

खुलताबाद–सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मालकीच्या विश्रामगृहाची वास्तू ही १०५ वर्षांपूर्वीची निजामकालीन सुंदर वास्तू आहे. या वास्तूच्या तळघरात निजामकालीन वस्तूंचा संग्रह होता. या ठिकाणी शाकाहारी व मासाहारी भोजन ऑर्डरप्रमाणे मिळते. येथे राहण्यासाठी सार्वजनिक बांधकाम पश्चिम विभाग औरंगाबाद येथून बुकिंग करावे लागते.

हजरत शेख मुन्तजीबोद्दिन उर्फ जर जरी जर बक्ष दर्गा, खुलताबाद – मराठवाड्यातील सर्वात मोठा उरूस येथे भरतो. खाजा हा मैदा, तूप, साखर यापासून बनविलेला पदार्थ प्रसाद म्हणून प्रसिध्द आहे.

मलिक अंबर कबर

खुलताबाद – औरंगाबाद शहराचा वास्तुविशारद म्हणून ओळखला जाणारा मलिक अंबर यांची कबर खुलताबाद विश्रामगृह रस्त्यावर आहे.

वेरूळ लेणी (३० कि.मी.) – वेरूळ येथे बौद्ध, हिंदू, जैन धर्मियांच्या कोरीव शिल्पकलेचा अजब नमुना पाहायला मिळतो. वेरूळ लेणी पाहण्याची पायी मजा काही औरच. लेणी जवळच वेरूळ पर्यटन केंद्र आहे. तेथे पार्किंगची व्यवस्था आहे. आतमध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेतून दृकश्राव्य माध्यमातून लेणीची माहिती देण्यात येते. मंगळवारी लेणी बंद असते, यांची नोंद घ्यावी.

श्री घृष्णेश्‍वर मंदिर वेरूळ

बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्‍वर मंदिर प्रसिध्द आहे. बारा ज्योतिर्लिंग असलेले घृष्णेश्वराचे दर्शनानंतरचा बारा ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण होते. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. श्रावण महिन्यात शिवभक्तांची घृष्णेश्वराचे दर्शनासाठी गर्दी उसळते.

शहाजीराजे भोसले स्मारक, वेरूळ – छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या मालकीच्या गढीवर शहाजीराजे भोसले स्मारक उभारण्यात आलेले आहे.

म्हैसमाळ (३५ कि.मी.) – मराठवाड्याचे थंड हवेचे ठिकाण. हिलस्टेशन. श्री गिरिजादेवी मंदिर, श्री व्यंकटेश बालाजी मंदिर, श्री गोरक्षनाथांचे स्थान, श्री गिरिजादेवीचे जुने ठाणे ही धार्मिकस्थळ. दूरदर्शन मनोरा येथील व्ह्यू पॉइंटवरून दिसणारे विलोभनीय विहंगम दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. सूर्यास्त पाहण्यासाठी सायंकाळी येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.

खुलताबाद, सुलीभंजन, वेरूळ, म्हैसमाळ परिसरातील भटकंती आपल्याला अनोख्या भावविश्वात घेऊन जाईल. यात शंका नाही!

Related Stories

No stories found.