पर्यटकांच्या मदतीसाठी टुरिझम पोलीस

jalgaon-digital
2 Min Read

संदीप तीर्थपुरीकर 

औरंगाबाद – Aurangabad

करोना संसर्गकाळामुळे देशभरातील टुरिझम Tourism थांबले असले तरी औरंगाबाद शहरातील विविध पर्यटन स्थळांवर तैनात टुरिझम पोलीस यंत्रणेमुळे येणाऱ्या काळात टुरिझम सुरू झाल्यावर नक्कीच याचा लाभ होणार आहे. पाच वर्षांपासून या यंत्रणेने पर्यटकांचा विश्वास संपादन केला हेही तितकेच महत्त्वाचे होय. 

पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षा व सुविधेसाठी पोलीस विभागाने सुरू केलेल्या टुरिझम पोलीस यंत्रणेला पाच वर्षे झाली असून या यंत्रणेच्या कामकाजावर देशी-विदेशी पर्यटक चांगलेच खूश आहेत. 

एखाद्या वेळी चुकून तिकिटाचे जास्तीचे पैसे जास्तीचे अदा केले असतील तर ते पैसे परत मिळतील अशी शक्यता नसते. परंतु, टुरिझम पोलिसांमुळे हे शक्य झाले. ही बाब आमच्या अपेक्षेपलिकडची असून औरंगाबाद खरोखर ग्रेटच आहे, अशा शब्दात कोरियन पर्यटकांनी टुरिझम पोलिसांवर कौतुकाची थाप मारली.गेल्या ११ महिन्यात अडचणीत सापडलेल्या असंख्य पर्यटकांच्या मदतीसाठी धावून जाणारे टुरिझम पोलिस यामुळेच पर्यटकांच्या विश्वासास पात्र ठरत आहेत.

राज्याच्या पर्यटन राजधानीत अडचणीत सापडलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी खास टुरिझम पोलीस पथक स्थापन केले. इंग्रजीत संभाषण करू शकणारे, चांगले व्यक्तिमत्त्व असणाऱ्या चार जणांची टीम यासाठी तयार करण्यात आली. 

डॅनियल फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल शेवाळे, राहुल सोळुंके आणि मन्सूर शाह या चार पोलिसांची पथकात नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यासाठी खास पीसीआर व्हॅन तयार करून त्यावर अौरंगाबादची पर्यटन स्थळे फ्लेक्सच्या माध्यमातून चिटकवण्यात आली. दिवसभरात बीबी-का-मकबरा, विद्यापीठातील हिस्ट्री म्युझियम, सोनेरी महाल, औरंगाबाद लेणी, पानचक्की असा प्रवास करत ही व्हॅन दौलताबाद किल्ल्यावर जाते. प्रत्येक ठिकाणी निश्चित वेळ थांबून तेथील हालचालींवर नजर ठेवते. पोलिसांच्या कंट्रोल रूमला मिळणाऱ्या तक्रारीवरून व्हॅन थेट घटनास्थळी पोहचते.व्हॅनवरही कंट्रोल रूमचा नंबर आहे. त्यावरही पर्यटक फोन करून आपल्या तक्रारी मांडतात.

टुरिझम पोलिसिंगच्या माध्यमातून पर्यटकांचा विश्वास वाढावा, हा एकमात्र उद्देश आहे. पर्यटनस्थळी रोमियो मंडळी बऱ्याच प्रमाणात असतात. तसेच अशा ठिकाणी टॅक्सी, रिक्शा चालकांकडून बाहेरगावावरून आलेल्या पर्यटकांची अडवणूक करण्याचे फार प्रकार होत असतात.

बऱ्याचदा मुली व महिलांची छेडछाड, पाकिटमारी, बॅग, कॅमेरा, मोबाइल हिसकावणे यासारखे प्रकार होत असतात. या सर्व प्रकारांना टुरिझम पोलीस पथकाच्या स्थापनेनंतर बऱ्यापैकी आळा बसला आहे. पर्यटनवाढीच्या दृष्टीने अशा प्रकारच्या वेगळ्या उपक्रमांचा निश्चितच फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *