टोमॅटो, ढोबळी मिरची, दोडके ८० रुपये पार !

अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे नुकसान
टोमॅटो, ढोबळी मिरची, दोडके ८० रुपये पार !

औरंगाबाद-Aurangabad

मराठवाड्यात सततचा पाऊस आणि त्यात झालेली अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून आवक मंदावली आहे. त्यामुळे दर्जेदार मालास अधिक भाव आला असून, टोमॅटोसह वांगे, गवार, फ्लॉवरसह भाजीपाल्याचा तोराही अधिक वाढला आहे. यात यात चवळी, टोमॅटो, ढोबळी मिरची, दोडकेचे दर किलोमागे ८० रुपयांच्या घरात गेले आहेत.

औरंगाबादसह मराठवाड्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे. लाखो हेक्टरवरील खरीप पिक यामुळे वाया गेले असून भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे. उत्पादनावर झालेल्या परिणामामुळे दर्जेदार मालास अधिक भाव मिळत आहे. जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील फळ व भाजीपाला मार्केटमध्येही या पेक्षा वेगळे चित्र नाही. 'सुमारे २५ दिवसापूर्वी कांद्याचा दर हा २० ते २५ रुपये प्रतिकिलोच्या घरात होता. सध्या कांद्याचे भाव दुपट्टा वाढले असून, ४० रुपये दराने त्याची विक्री होत आहे. मध्यंतरी कांद्याचे दर ५० रुपयांच्या घरातही गेले होते,' अशी माहिती टीव्ही सेंटर येथील भाजीपाला विक्रेते नरहरी येवलेकर यांनी सांगितले. पांढऱ्या लसणाचे दर चढे असले, तरी गेल्या काही दिवसांत बऱ्यापैकी स्थिर आहे. पांढऱ्या लसणाचा दर सध्या ८० ते १०० रुपये प्रतिकिलो असून, एक किलो गावरान लसणासाठी ग्राहकांना १६० ते १८० रुपये मोजावे लागतात. बटाट्याचे भावही पाच रुपयांनी वधारले असून, २५ रुपये किलो या दराने विक्री होत आहे.

वांगे, भेंडी, गवारचे दरही वधारले आहेत. वांगे ७० रुपये तर गवारचे भाव किलामागे ८० ते १०० रुपयांच्या घरात असून भेंडीचे भावही दहा रुपयांनी वधारले आहेत. सध्या ५० ते ५५ रुपये किलो या दराने भेंडीची विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दुधी भोपळा ४० रुपये किलो, तर चवळी शेंगाचे दर ८० रुपये प्रती किलो झाले आहेत. फ्लॉवरच्या दरातही मोठी वाढ झाली असून ७० ते ८० रुपये प्रती किलोने त्याची विक्री होत आहे. तर पत्ताकोबीचे दर २५ ते ३० रुपये किलो असल्याचे येवलेकर यांनी सांगितले. आठ ते दहा दिवसापूर्वी फ्लॉवर, गवारचे भाव किलामागे १०० रुपयांच्यावर गेले होते, असेही त्यांनी नमूद केले. यासह ५० रुपयांना मिळणाऱ्या ढोबळी मिरचीसाठी ग्राहकांना ७० ते ८० रुपये मोजावे लागत असून, दोडक्याचे दरही ८० रुपये प्रतिकिलो झाले आहेत.

दीड महिन्यातच टोमॅटोला भाव

ऑगस्ट महिन्यात भाव नसल्याने अनेक ठिकाणी आंदोलन करत शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून दिले होते. सध्या चित्र बदले असून, काही महिन्यात कवडीमोल भावाने विक्री झालेल्या टोमॅटोने आता जबरदस्त भाव खाण्यास सुरुवात केली आहे. ७० ते ८० रुपये प्रतिकिलो या दराने त्याची विक्री होत आहे. यासह काकडी ३० रुपये, हिरवी मिरची ४० ते ५० रुपये, गाजर ७० ते ८० रुपये प्रतिकिलो असे दर आहे. तर आवक कमी असल्याने शेवगा शेगाचे भाव एका किलोसाठी १०० रुपयांच्या घरात गेल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

पालेभाज्या महागल्या

बाजारात पालेभाज्याच्या दरातही वाढ झाल्याचे चित्र आहे. यात कोथिंबीर, पालक, मेथी आदी पालेभाज्याची एक जुडी १५ ते २० रुपयांना मिळत असून शेपूच्या एका जुडीसाठी ग्राहकांना १० रुपये ग्राहकांना मोजावे लागतात, अशी माहिती भाजीपाला विक्रेत्यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com