खासगी रुग्णालयांतील गरीब रुग्णांना रेमेडिसीवीर इंजेक्शन 2360 रुपयांत द्या

jalgaon-digital
4 Min Read

औरंगाबाद – Aurangabad – प्रतिनिधी

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे नव्वद टक्क्यांच्या वर पोहचले असून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ या मोहीमेच्या सर्वेक्षणातून विविध आजारांची लक्षणे असलेल्या एक लाख लोकांची माहिती प्राप्त झाली आहे.

त्या लोकांच्या प्राधान्याने तातडीने आटीपीसीआर चाचण्या करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी समवेतच्या कोरोना आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण बोलत होते. बैठकीला खा. इम्तियाज जलील, खा. डॉ. भागवत कराड, आ. हरिभाऊ बागडे, आ. संजय शिरसाठ, आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे, यांच्यासह पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अन्न औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय काळे, घाटी रुग्णालयाचे डॉ. झीने, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी सांगितले जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ मोहिमे प्रभावीपणे राबवण्यात येत असून या अंतर्गत संसर्ग टाळण्यासाठीचे मार्गदर्शन आणि संशयितांची तपासणी व त्यांना आवश्यक उपचार तातडीने देण्यात येत आहे. त्याप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यातही कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवण्यात येणार असल्याचे सांगून श्री. चव्हाण यांनी रेमेडीसीवरी इंजेक्शन जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून गरीब रुग्ण जे खासगी रुग्णालयांमध्ये दाखल आहेत त्यांना अन्न औषध प्रशासनामार्फत 2360 रु. या सवलतीच्या दरात हे इंजेक्शन उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याचे सांगितले. तसेच कोरोनातून बरे झालेल्यांना पुढील काळासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले

खा. श्री. कराड , आ.श्री. सावे यांनी रुग्णांचे वेळेत निदान होण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, असे सूचीत केले. खा. श्री. जलील, आ.श्री. बागडे यांनी मास्क वापराबाबत तसेच रेमेडीसीवीर इंजेक्शन गंरीब रुग्णांसाठी सवलतीत उपलब्ध होणार आहे, याबाबत जनजागृती करण्याचे सांगितले. आ. श्री. शिरसाठ यांनी कोरोनातून बरे झालेल्यांना पूढील काळात काही त्रास जाणवत नाही ना यासाठीचा पाठपुरावा करावा. तसेच खासगी रुग्णालयामधून कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचारांवर तसेच देयकांवर नियंत्रण ठेवण्याचे सूचित केले. आ. दानवे यांनी सर्व एटीएम सेंटरचे निर्जतुकीकरण करावे. तसेच मास्क वापराबाबत मनपा, पोलीसांनी कडक कारवाई करावी, जेणेकरुन नागरीकांमध्ये मास्क वापराचे प्रमाण वाढेल, असे सूचित केले.

अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असून रुग्णालयात दाखल रुग्ण संख्याही कमी होत आहे. जिल्ह्यात पूरेशा प्रमाणात रेमेडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध असून सध्या एकूण 2637 रेमेडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध असून घाटीत 998, मनपाकडे 260 आणि जिल्हा रुग्णालयात 1379 इंजेक्शन उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते असून 90.69 टक्के आहे तर मृत्यूदर 2.67 टक्के वर आला आहे.जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्या 101117 तर ॲण्टीजन चाचण्या 279014 या प्रमाणे एकुण चाचण्या 380131 इतक्या झाल्या आहेत. तसेच डिसीएचसी, डिसीएच, डिसीसीसी अशा एकुण 115 ठिकाणी 11957 आयसोलेशन बेड तर 2217 ओटु बेड उपलब्ध आहे. तसेच 521 आयसीयु बेड तर 287 व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत, होम आयसोलेशनद्वारे 2255 रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी डॉ. गव्हाणे यांनी यावेळी दिली.

यावेळी जिल्ह्यात अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून त्याबाबतचे पंचनामे तातडीने पूर्ण करुन शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य मिळण्यासाठी त्याचा अहवाल वेळेत शासनाला सादर करावा तसेच विमा कंपन्यांनाही त्याबाबत वेळेत कळवावे, असे सर्व उपस्थित लोकप्रतिनिधीनी सूचित केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *