आजवर 23 हजार बाधितांनी घेतला होम आयसोलेशनचा आधार 

आता होम आयसोलेशन बंद
आजवर 23 हजार बाधितांनी घेतला 
होम आयसोलेशनचा आधार 

औरंगाबाद - Aurangabad

आजवर शहरात सुमारे 85 हजार कोरोनाबाधित निघाले आहेत. यापैकी सुमारे 23 हजार बाधितांनी होम आयसोलेशनअंतर्गत घरीच उपचार घेतले आहेत. मात्र घरीच उपचार घेणार्‍यांपैकी अनेकांना दहा दिवसानंतरही बरे वाटले नसल्याने पोस्ट कोविडअंतर्गत खासगी रुग्णालयांतूनही काही दिवस उपचार घ्यावे लागले असल्याचे समोर आले आहे. आजवर होम आयसोलेशनअंतर्गत उपचार घेणारे बरेच रुग्ण घराबाहेरही वावरत होते, हेही एक कारण संसर्गवाढीस कारणीभूत मानले जात आहे.

औरंगाबाद शहरात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने मार्च आणि एप्रिल महिन्यात चांगलेच थैमान घातले होते. विशेष म्हणजे या काळात राज्यभरातही मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित आढळू लागल्याने सर्वत्र बेड्सची मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे राज्य सरकारने सौम्य लक्षणे असलेल्या व घरी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था असेल अशा रुग्णांना होम आयसोलेशन अर्थातच घरीच उपचार घेण्यास परवानगी दिली.

शासन निर्देशानुसार औरंगाबाद पालिकेनेही रुग्णांकडून खासगी डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेऊन घरीच उपचार घेण्यास परवानी दिली. त्यानुसार मार्च आणि एप्रिल महिन्यात सुमारे चार हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्णांनी घरीच उपचार घेतले. पालिकेकडून प्राप्‍त आकडेवारीनुसार शहरात आजवर 22,929 बाधितांनी घरीच उपचार घैतले आहेत. यापैकी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मार्च आणि एप्रिल महिन्यातील बाधितांची संख्या अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र पालिकेच्या कोविड वॉर रूममधून मार्चमध्ये 2,241 तर एप्रिलमध्ये 1,129 रुग्णांनीच होम आयसोलेशनअंतर्गत उपचार घेतल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी होम आयसोलेशनची सेवा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. घरीच उपचार घेणारे अनेक कोरोना रुग्ण घराबाहेर वावरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना कोविड सेंटर किंवा रुग्णालयात जाऊनच उपचार घ्यावे लागणार आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com